गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:59 AM2022-12-09T08:59:27+5:302022-12-09T08:59:57+5:30
मोदीमॅजिक विक्रम : भाजपचा बालेकिल्ल्यात ‘न भूतो’ विजय, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे,
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपच्या यशाचे कमळ फुलले, तर हिमाचल प्रदेशात जनतेने भाजपविरोधी कौल दिला असून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून तेथील आजवरची सर्वांत विक्रमी कामगिरी केली. गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागांवर रोखणाऱ्या काँग्रेसची दारूण स्थिती झाली. मोठा गाजावाजा करत मैदानात उतरलेला आप पक्ष राज्यात चंचूप्रवेश करू शकला.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भाजपला २५ जागांंवर यश मिळाले आहे. आप पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या कारभारावर जनता नाराज होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे.
जिंकण्याची ५ कारणे...
गुजरात - भाजप
मोदी ब्रँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी प्रचंड सभा घेतल्या. त्यांच्या ब्रँडनेमवर निवडणुकीचे चित्रच बदलले. वातावरण निर्मितीसाठी भाजप प्रचारकांचीही फौज होतीच.
व्यवस्थापन : निवडणूक व्यवस्थापन काँग्रेस आणि आपपेक्षा चांगले होते.
तिकिटांचे गणित : नव्या चेहऱ्यांवर लक्ष दिले. दिग्गजांची तिकिटे कापली. त्याचा फायदा झाला.
अस्मितेला हात : भाजपच्या नेत्यांनी सर्वच सभांमध्ये गुजराती अस्मितेवर भर दिला. ते मतदारांना भावले.
नेटवर्क : रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे, भाजपचे ग्रामीण, शहरी भागापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते यांचा मोठा फायदा झाला.
हिमाचल - काँग्रेस
नाराजी : भाजपचे मुख्यमंत्री ठाकूर यांच्या कारभारावर जनता होती नाखूश. ते काँग्रेसच्या पथ्यावर पडले.
असंतोष : सरकारविरोधात लोकांमधील असंतोषाचा काँग्रेसला फायदा.
परंपरा : प्रस्थापितां विरोधात मतदान करण्याची परंपरा कायम राहिली.
भाजपचे अपयश : विकासाची दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अयशस्वी.
एकच पर्याच : म्हणून काँग्रेसला जनतेने पाच वर्षांनी पुन्हा दिली सत्ता.