लोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी आम आदमी पार्टीला भरभरून मते देत काँग्रेस, भाजप, अकाली दल यांच्यासह इतर सर्वच पक्षांना भुईसपाट करत राज्यात बदल घडवून आणला आहे. आप ९२, काँग्रेस १८, अकाली दल ४, भाजप २ तर अन्य १ याप्रमाणे या पक्षांना जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आपचे भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून पराभूत झाले आहेत. आपच्या जीवनज्योत कौर यांनी सिद्धू यांचा ६,७५० मतांनी पराभव केला.
आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन.
हा जनादेश विनम्रपणे स्वीकारत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी ट्विट केले की, जनता की आवाज, भगवान की आवाज है... पंजाबच्या लोकांचा निर्णय विनम्रपणे स्वीकार करीत आहोत. संगरुरमध्ये पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चड्ढा म्हणाले, आगामी काळात आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून समोर येईल आणि काँग्रेसची जागा घेईल.
भगवंत मान म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, हे विद्यार्थी शिकण्यासाठी बाहेर का जातात, आम्ही स्वस्तात सुविधा का देत नाहीत. पंजाबला योग्य मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करू. एका महिन्यातच बदल दिसून येतील, असे सांगून ते म्हणाले की, आता मंत्री आम आदमीच्या समस्या समजावून घेण्यासाठी गावात आणि रस्त्यांवर येतील. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, यापूर्वीचे सरकार मोतीबाग पॅलेस (पटियालातील अमरिंदर सिंग यांचे निवासस्थान), बडी दिवारोंवाले घर (लाम्बीतील बादल यांचे घर) येथून चालत होते. आता हे सरकार राज्यातील लोकांचे आहे.
भगतसिंग यांच्या गावात शपथविधीआपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांच्या नवांशहर जिल्ह्यात खटखड कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर ते शहिदांच्या स्मारकस्थळी जाऊन दर्शन घेतील. यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ पंजाबच्या राजभवनात होत होती. मान यांनी सांगितले की, पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो लागणार नाही. सरकारी कार्यालयात आता शहीद भगतसिंग आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लागतील.