नवी दिल्ली – देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. ५ राज्यांपैकी ४ राज्यात भाजपा तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या जवळ पोहचला आहे. ५ राज्यांच्या निवडणूक निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले होते. त्यातच शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपाला बसू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. परंतु निवडणूक निकालावर फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आले. यूपीत भाजपाच्या काही जागा कमी झाल्या परंतु ३७ वर्षांनी पुन्हा एकदा भाजपा बहुमत मिळवण्यात यशस्वी झाली.
५ राज्यांच्या निवडणूक निकालात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आले. पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं मोठा झटका दिला आहे. आम आदमी पक्षाच्या लाटेत काँग्रेसची दाणादाण उडाली आहे. पंजाबच्या एकूण ११७ जागांपैकी आपला ९१ जागा, तर काँग्रेसला १७ जागांवर आघाडी आहे. पंजाबमध्ये झालेल्या पराभवानंतर आता देशभरात केवळ २ राज्यातच काँग्रेसचा मुख्यमंत्री सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे भाजपानं काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली होती. त्यात आणखी एका राज्याची भर पडली आहे. छत्तीसगड येथे भूपेश बघेल आणि राजस्थान अशोक गहलोत वगळता इतर कुठल्याही राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही.
काँग्रेसमध्ये G-23 गट पुन्हा सक्रीय होणार?
जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनायकसारख्या नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले ते म्हणजे अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal). आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ केला आहे. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा पराभव केला. ममता बॅनर्जींनीही काँग्रेसपासून फारकत घेतल्यानं पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस साफ झाली. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा एकहाती कारभार सुरू आहे. आता पंजाबही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हातातून निसटलं आहे.
विशेष म्हणजे या सर्व राज्यात भाजपा काँग्रेसला(Congress) एक पाऊल मागे अथवा तिसऱ्या नंबरवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. काही राज्यात त्याला यश आलं. मणिपूर इथंही तेच झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारत अभियानात इतर सहकारीही जोडले गेले. त्यामुळे अंतरिम अध्यक्षाच्या बळावर सुरू असलेल्या सर्वात जुन्या पार्टीतील २३ नाराज नेते पुन्हा एकदा गांधी कुटुंबाविरोधात प्रहार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्या रणनीतीनं ५ राज्यांच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील वाद शमवण्यात यश आले. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करताना दिसून आले.