Assembly Election Results: गुजरातमध्ये भाजपा, तर हिमाचलमध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये असं चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:37 AM2022-12-08T08:37:18+5:302022-12-08T08:38:02+5:30
Assembly Election Results: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू असून, त्याचे कल समोर आहेत.
नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू असून, त्याचे कल समोर आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये गुजरातमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे.
गुजरातमध्ये आतापर्यंत १४८ जागांचे कल समोर आले असून, त्यामध्ये भाजपा १०१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने ४३ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर आप चार जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने ९९ जागा जिंकून काठावरच्या बहुमतासह सत्ता राखली होती.
तर हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी सत्तापरिवर्तनाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांवर मतमोजणी सुरू आहे. त्यात सुरुवातीला समोर आलेल्या ४५ जागांच्या कलांमध्ये भाजपाने २० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने २२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. हिमाचलमध्ये एकूण ६८ जागांसाठी ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. जवळपास ७५ टक्के मदरातांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. मात्र यावेळी राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.