राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. याच दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
निकाल येण्यापूर्वीच लोक ढोल वाजवून विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यांच्या हातात भगवान रामाचा फोटो असलेले पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. यासोबतच त्यांनी आपला पक्ष चारही राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर्सवर भगवान रामाचे फोटो आहेत. पोस्टर्सवर "राहुल प्रियंका का देखो खेल, भाजपा की बना दी रेल" असं म्हटलं आहे. तसेच पोस्टरवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या फोटोसह अनेक घोषणा देखील लिहिल्या आहेत. सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे. "अबकी बार झोला उठाए मोदी सरकार"; "भारत का विश्वास है, राहुल-प्रियंका" असं देखील पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह आहे. निवडणूक निकालापूर्वीच मिठाई वाटपाची पूर्ण तयारी दिसून येत आहे.