उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव, प्रियंका गांधींची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:25 PM2021-10-19T14:25:43+5:302021-10-19T15:58:08+5:30
UP Assembly Election: लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधींनी ही माहिती दिली.
लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनऊमधील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला 40 टक्के महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. याची सुरुवात 40 टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात 50 टक्के महिलांना तिकिटे दिली जाईल. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असं प्रियंका म्हणाल्या.
केंद्र आणि योगी सरकारला घेरले
यावेळी प्रियंका गांधी यांनी केंद्र आणि योगी सरकारवरही निशाणा साधला. आज सत्तेच्या नावाखाली तुम्ही जनतेला खुलेआम चिरडू शकता, तुमच्यात खूप द्वेष भरला आहे. पण, महिला हे बदलू शकतात. तुम्ही राजकारणात माझ्या खांद्याला खांदा लावून सामील व्हा. देशाला धर्माच्या राजकारणातून बाहेर पडून पुढे नेले पाहिजे. महिलांना हे काम स्वतः करावे लागेल, असंही त्या म्हणाल्या.