कानपूरमधील अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या घरातून तब्बल 200 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. यावरून आता उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीच राजकारण तापताना दिसत आहे. यासंदर्भात, जप्त झालेला हा पैसा कुणाचा आहे? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी सरकारला केला होता. यावर आधी गृहमंत्री अमित शाह आणि आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कानपूरमध्ये उत्तर दिले आहे.
हा पैसा समाजवादी पक्षाचाच असल्याचे भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यापूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा जप्त केलेला पैसा म्हणजे, मागील सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची दुर्गंधी असल्याचे म्हटले आहे.
PM मोदी म्हणाले - नोटांचा पहाड सर्वांनीच बघितला -या छाप्यात जप्त झालेले 194 कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवाल करत, यावर सरकारने उत्तर द्यावे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना पीएम मोदी कानपूरमधील सभेत म्हणाले, गेल्या दिवसांत पैशांनी भरलेले जे बॉक्स सापडले, हे लोक त्यातही म्हणतील, की हे भाजपनेच केले आहे. 'मागच्या सरकारने भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते सर्वांच्या समोर आले आहे. पण आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत आणि याचे क्रेडीट घ्यायला तयार नाहीत. तसेच, नोटांचा पाहाड सर्वांनी पाहिला आहे, हेच यांचे (सपा) यश आहे,' असा टोलाही मोदींना लगावला. '
पकडला गेलेला पैसा समाजवादी पक्षाचा - अमित शाहगृहमंत्री अमित शाह यांनीही हरदोई येथील जाहीर सभेत अखिलेश यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आज त्यांना उत्तर देणे जमेना, कारण हा पैसा समाजवादी पक्षाच्याच अत्तर बनवणाऱ्याकडे सापडला आहे. एवढेच नाही, तर अखिलेश जी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही काळा पैसा संपवण्यासंदर्भात बोललो आहोत. आज रेड होत असल्याने त्यांना अस्वस्थ होत आहे. समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडून तब्बल अडीचशे कोटी रुपयांचे घबाड मिळाले आहे, असेही शाह म्हणाले.