नवी दिल्ली - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील, असा टोमणा समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी मारला आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार आले तर काय होईल? या प्रश्नाला उत्तर देताना, योगी आदित्यनाथ पुन्हा निवडणूक जिंकले तर पंतप्रधानपदाचे दावेदार होतील. दुहेरी इंजिनची आधीच टक्कर होत असताना, भाजपच्या लोकांनी याचा विचार करायला हवा, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'UP+YOGI खूप आहे UPYOGI', असे म्हणत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'अनुपयोगी' म्हटले आहे. तसेच, केंद्र आणि राज्याच्या 'डबल इंजिन' वक्तव्यावरही निशाणा साधला. ते आज तक या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
जिल्हा पंचायत निवडणुकीत केलेल्या फसवणुकीची शिक्षा मिळणार -सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, पंचायत निवडणुकीतच जनतेने जवळपास निर्णय केला होता. मात्र सरकारी यंत्रणेमुळे अनेकांना फॉर्मदेखील भरता आले नाही. निवडणुकीत महिलांच्या साड्या ओढण्याच्या आणि कपडे फाडण्याच्या फोटोंनी तर महाभारताची आठवण करून दिली होती. लोकशाहीत असे दृश्य कुणी पाहिले नसेल. भाजपवर हल्ला चढवताना अखिलेश म्हणाले, जेव्हा-जेव्हा एखाद्याकडून सन्मानाला ठेच लागते, तेव्हा-तेव्हा त्याला नक्कीच शिक्षा होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत यूपीची जनता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या फसवणुकीची नक्कीच शिक्षा देईल.
भाजपला यावेळी राधे-राधे म्हणणार जनता -कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे.