Assembly elections 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाच राज्यांमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी पाचही राज्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची सुरुवात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनं होणार असून १० फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत एकूण सात टप्प्यात मतदान होत आहे.
उत्तर प्रदेशच्या ४०३ विधानसभा मतदार संघांसाठी सात टप्प्यात मतदार आपलं मत देणार आहेत. १० फेब्रुवारी ते सात मार्च पर्यंत सात टप्प्यात मतदान होत आहे. तर उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होमार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून १७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी रोजी पहिला टप्पा, १४ फेब्रुवारी रोजी दुसरा टप्पा, २० फेब्रुवारी रोजी तिसरा, २३ फेब्रुवारी रोजी चौथा, २७ फेब्रुवारी पाचवा, ३ मार्च सहावा आणि ७ फेब्रुवारी रोजी सातव्या टप्प्याचं मतदान होणार आहे.
२४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणारपाच राज्यांमध्ये एकूण ६९० विधानसभा मतदार संघांसाठी मतदान होणार आहे. यात १८.३४ कोटी मतदार आपलं मत नोंदवणार आहेत. १८.३४ कोटींपैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. तर एकूण २४.९ लाख मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी यावेळी दिली.