नवी दिल्ली - गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. पैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे. सुरुवातीचे कल पाहता पंजाबसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. याच दरम्यान आता काँग्रेसने ईव्हीएमवर आपला राग काढला आहे.
काँग्रेस पिछाडीवर असताना दिल्लीमध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे. कार्यकर्ते ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा निषेध करणारे बॅनर हाती घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल प्रियंका गांधी सेना असं या बॅनरवर लिहिलेलं असून त्याखाली ईव्हीएमचा निषेध करणारा मेसेज लिहिण्यात आला आहे. तसेच "ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे" असं यावर म्हटलं आहे.
सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर; काँग्रेसला धक्का, आपची मुसंडी
सोनू सूदची बहीण मालविका सूदने (Malvika Sood) राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली. मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून तिला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पण सुरुवातीचे कल पाहता मालविका सूद पिछाडीवर आहे. मोगा विधानसभा जागेवर, आतापर्यंत झालेल्या एकूण 15 विधानसभा निवडणुकांपैकी ही जागा 10 वेळा काँग्रेस पक्षाकडे गेली आहे. 1977 ते 2017 पर्यंतच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने येथून सहा वेळा विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत हरजोत सिंग कमल विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी सोनू सूद देखील बहिणीच्या प्रचारासाठी मोगा येथेच होता. तेव्हा सोनू सूदला मोगा येथे मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं.
"केजरीवाल पंतप्रधान होतील; आप देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल"
पंजाबमध्ये 'आप'नेकाँग्रेस आणि भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत पंजाबमध्ये आम आदमी पक्ष इतर पक्षांच्या तुलनेत खूप पुढे दिसत आहे. पंजाबमधील सुरुवातीचे कल पाहिल्यावर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आप आता राष्ट्रीय शक्ती आहे, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पंतप्रधान होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल" असं म्हटलं आहे. तसेच निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना याचे श्रेय जाते. या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला ही भेट दिली आहे असंही म्हटलं आहे.