नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. मागील २ महिन्यापासून देशभरात ५ राज्यांच्या निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत विरोधक-सत्ताधारी एकमेकांचे वाभाडे काढत होते. ७ मार्च रोजी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. त्यानंतर आता सर्वांना या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा, सपा यांच्यात मुख्य लढत आहे तर पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला होता. या २ राज्यांव्यतिरिक्त उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये काँग्रेस, AAP ने सत्तेत विराजमान असलेल्या भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान उभं केले आहे. एकीकडे मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी EVM पूर्ण सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक आहे. मतमोजणी केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळतो. EVM वर भरवसा ठेवला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाने केला होता आरोप
चुरशीच्या झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्चला आटोपले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येईल, असा कल वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली.. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून EVMशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला होता.
अखिलेश यादव(Akhilesh Yadav) म्हणाले होते की, भाजपा जिंकेल असा मतप्रवाह एक्झिट पोल निर्माण करत आहेत. ही लोकशाहीची शेवटची लढाई आहे. उमेदवारांना न सांगता ईव्हीएम पोहोचवल्या जात आहेत. जर ईव्हीएम अशा प्रकारे नेण्यात येत असतील तर आपल्याल सतर्क राहिले पाहिजे. ही चोरी आहे. आपली मते वाचवण्याची गरज आहे. आम्ही याविरोधात न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यापूर्वी मी लोकांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन करतो असं त्यांनी सांगितले.