नवी दिल्ली - काँग्रेसला पाचही राज्यात मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. याच दरम्यान काँग्रेसने आपल्या पराभव स्वीकारला आहे. "जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो" असं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते आर. एस. सुरजेवाला (Congress RS Surjewala) यांनी निवडणुकांच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. "पाच राज्यांचे निकाल काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेविरुद्ध आले आहेत, पण जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे आम्ही मान्य करतो. सोनिया गांधी यांनी निकालाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी आपण जनतेचा निर्णय स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही जनतेचा निर्णय स्वीकारत आहोत. ज्या लोकांना जनतेनं कौल दिला त्यांना हार्दिक शुभेच्छा. मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वॉलेंटिअर्स यांना शुभेच्छा. आम्ही यातून शिकू आणि जनहितासाठी काम करत राहू," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद पराभूत
पंजाबच्या मोगा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद यांचा आपच्या डॉ अमनदीप कौर अरोरा यांनी २०,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. लोकांना राजकारणात एक पर्याय मिळाला आणि पंजाबच्या जनतेने त्या पर्यायाला संधी दिली असं आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. तसेच पंजाबवालो तुस्सी कमाल कर दित्ता असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यासोबतच लोकांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवला आहे, आम्ही तो तोडणार नाही. आम्ही या देशाचे राजकारण बदलू असंही म्हटलं आहे.
"उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले"
उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले. आम्हाला खात्री होती की लोक बदलाला मतदान करतील, आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता असेल, मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी घेतो असं काँग्रेस नेते हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यासाठी निकाल खूप आश्चर्यकारक आहेत. मला समजू शकत नाही की एवढ्या प्रचंड महागाईनंतर, जर हा जनतेचा आदेश असेल, तर लोककल्याण आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय आहे? यानंतर लोक 'भाजपा जिंदाबाद' म्हणतील हे मला समजत नाही असंही ते म्हणाले.