भाजपची सावध भूमिका की रणनिती? PM मोदींच्या नावावर लढवली जातेय विधानसभेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:58 PM2023-10-20T21:58:32+5:302023-10-20T21:59:13+5:30
नोव्हेंबर महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.
Assembly elections 2023 News: नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तीन राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, तेलंगणा आणि मिझोरमबाबत भाजप सावध भूमिका घेत आहे. गटबाजी टाळण्यासाठी पक्षाने अद्याप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
चारपैकी फक्त मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. 2018 मध्ये शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप बहुमताच्या जवळ पोहोचली होती, बहुमत न मिळाल्यामुळे काँग्रेसने सरकार स्थापन केले. नंतर, काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा घेत शिवराजसिंह चौहान यांचे सरकार स्थापन झाले. छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या तीन टर्म सरकारला जनतेने पूर्णपणे नाकारले होते. राजस्थानबद्दल जनतेने इतिहास कायम ठेवत भाजपला निरोप दिला. तर तेलंगणात भाजप संघटनात्मकदृष्ट्या पुरेसा फायदा घेऊ शकले नाही.
आता भाजपने मुख्यमंत्रिपदाची घोषणा का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल तज्ञांची थोडी वेगळी मते आहेत. कोणत्याही एका नावाची घोषणा केली म्हणजे पक्षात दुफळी वाढेल, असे पक्षाच्या हायकमांडला वाटते, त्यामुळे निकाल येईपर्यंत नावावर सस्पेन्स कायम ठेवणे योग्य आहे. मुख्यमंत्री कोण होणार, यापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे. मतदारांचा रोष टाळण्यासाठी कोणत्याही विशिष्ट नावाचा उल्लेख करणे योग्य ठरणार नाही. या काही कारणांमुळेच भाजप मुख्यमंत्रीपदावर नाही, तर पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहे.