उन्नाव - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याचा आपल्या पक्षाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. तसेच, भाजपची खिल्ली उडवत, त्यांनी चुकून आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर जैनच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड)मधून त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक भाजप नेत्यांची नावेही बाहेर येतील, असा दावाही अखिलेश यांनी केला आहे. ते समाजवादी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
अखिलेश म्हणाले, 'भाजपने चुकून आपल्याच उद्योगपतीवर छापा टाकला आहे.' त्यांनी दावा केला, की समाजवादी अत्तर (परफ्यूम) पीयूष जैन नव्हे तर एमएलसी पुष्पराज जैन यांनी तयार केले होते. भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, "सत्ताधारी भाजपने डिजिटल चुकीने आपल्याच व्यापाऱ्यावर (पीयूष जैन) छापा टाकला." यावेळी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने, नोटाबंदी आणि जीएसटी अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे, असेही अखिलेश म्हणाले.
गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर विभागाने आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये, कानपूरमधील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 257 कोटी रुपये रोख, 25 किलो सोने आणि 250 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पीयूष जैनला सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तत्पूर्वी, अत्तर व्यापारी पियुष जैनचा समाजवादी पक्षाशी संबंध होता, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. हरदोईच्या सभेत मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते, की काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापे टाकले तेव्हा अखिलेश यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती. राजकीय द्वेषापोटी छापे टाकले जात असल्याचे ते म्हणू लागले. मात्र, आज समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडे टाकलेल्या छाप्यात अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत, यामुळे त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले आहे.