संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये हार पत्करावी लागलेल्या जागांवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसतानाही छत्तीसगडसाठी २१ व मध्य प्रदेशसाठी ३९ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात पाटन मतदारसंघात त्यांचे पुतणे विजय बघेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
दोन्ही राज्यांत भाजपने प्रत्येकी पाच महिलांना तिकीट दिले आहे. ज्या जागांवर विजय मिळण्याची शक्यता नाही तिथे खूप आधीपासूनच भाजपने उमेदवार घोषित केेले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना पूर्वतयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील विधानसभा जागांची भाजपने पुढीलप्रमाणे वर्गवारी केली आहे. हमखास विजय मिळणाऱ्या जागा अ गटात, कधी हार तर कधी विजय मिळणाऱ्या जागा ब गटात, दोनपेक्षा अधिक वेळा पराभव झालेल्या जागा क गटात, नेहमीच हार पत्कराव्या लागणाऱ्या जागा ड गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. छत्तीसगडमध्ये भाजपने भुलनसिंह मारवी (प्रेमनगर विधानसभा मतदारसंघ), शकुंतला सिंह पोर्थे (प्रतापपूर), आदी २१ जणांना उमेदवारी दिली.
मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लाल सिंह आर्य (गोहद विधानसभा मतदारसंघ), पक्षाचे राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धुर्वे (शाहपुरा), शहला मसूद हत्याकांडप्रकरणी चर्चेत असलेले ध्रुव नारायण सिंह (भोपाळ मध्य) आदी ३९ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अशी आहे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील स्थिती
२०१८ मध्ये भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ९० पैकी फक्त १५ जागा, तर काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या होत्या, तर २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने ११४ व भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर १५ महिन्यांनी भाजपने काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार पाडले व त्या जागी भाजपच्या शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आले होते.