हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १२ नोव्हेंबरला मतदान, तर ८ डिसेंबरला मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:19 PM2022-10-14T16:19:10+5:302022-10-14T16:20:10+5:30
Himachal Pradesh Assembly Elections 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज केली आहे. त्यानुसार हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नवी दिल्ली - यावर्षाच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकांकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. दरम्यान, या दोन राज्यांपैकी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज केली आहे. त्यानुसार हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार हिमाचल प्रदेशमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर आहे. २७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही २९ ऑक्टोबर आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होतील.
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमत मिळवत सत्ता स्थानप केली होती. सर्वसाधारणपणे हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत होत असते. मात्र यावेळी आम आदमी पक्षानेही निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशसोबतच गुजरातमधील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चर्चा होती. मात्र निवडणूक आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचाच कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमधील निवडणुकीचा कार्यक्रम हा दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.