नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या ४७५ जागांसाठी सुमारे ७५ टक्के मतदान नाेंदविण्यात आले. पश्चिम बंगाल आणि आसाम वगळता इतर राज्यांत मतदान शांततेत झाले. एकूण ६२९३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे. सर्वाधिक मतदान आसाममध्ये झाले असून, तब्बल ८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का काही प्रमाणात घसरला आहे. तिसऱ्या टप्प्यात दीड लाख मतदान केंद्रांवर मतदान झाले. तामिळनाडूमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ८ ते ९ टक्के मतदान कमी झाले आहे. तर आसाममध्येही सुमारे २ टक्के मतदान कमी झाले आहे. याचा निकालावर काय परिणाम हाेताे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काही ठिकाणी हिंसाचारामुळे मतदानाला गालबाेट लागले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांवर हल्ले करण्यात आले. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर केरळमध्ये किरकाेळ घटनांची नाेंद झाली. चार राज्यांतील मतदानाची टक्केवारीराज्य जागा उमेदवार मतदान (%)प. बंगाल ३१ २०५ ७७.६८आसाम ४० ३५७ ८२.२९तामिळनाडू २३४ ४४४९ ६५.११केरळ १४० ९५८ ७३.५८पुदुच्चेरी ३० ३२४ ७८.१३तृणमूलच्या आमदारावर हल्लासर्वांचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७.६८ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. तृणमूल काँग्रेसच्या आमदार सुजाता मंडल खान यांच्यावर हल्ला करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप करण्यात आला. पक्षाकडून ताे फेटाळण्यात आला आहे. या घटनेत सुजाता यांचा सुरक्षारक्षकही जखमी झाला आहे. याशिवाय तृणमूल काॅंग्रेसच्या आणखी काही उमेदवारांनी अशाच प्रकारचा हल्ला झाल्याचा आराेप केला आहे. उलुबेरीया दक्षिणमध्ये भाजपच्या उमेदवार पपिया अधिकारी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. तर भाजपचे स्वपन दासगुप्ता यांनीही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आराेप केला आहे. उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.मतदान सुरू हाेण्यापूर्वी हुगळीमध्ये एका भाजप समर्थक कुटुंबातील एकाची हत्या करण्यात आली. माधवी अदक असे या महिलेचे नाव असून, मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांना गंभीर दुखापत झाली हाेती. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आराेप अदक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर हावडा जिल्ह्यात उलूबेरिया उत्तर येथे तृणमूल काँग्रेसचे नेते गाैतम घाेष यांच्या घरी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र आढळल्यामुळे तणाव निर्माण झाला हाेता. याप्रकरणी घाेष यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर निवडणूक आयाेगाने एका अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेतआसाममध्ये अखेरच्या टप्प्यात ४० जागांसाठी मतदान झाले. किरकाेळ हिंसाचाराच्या घटना वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत झाले. दिघलतारी आणि बाेंगाईगाव येथे दाेन मतदान केंद्रांवर पाेलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून आला. तिसऱ्या टप्प्यात सुमारे ८२ टक्के मतदान नाेंदविण्यात आले. तर तिन्ही टप्पे मिळून आसाममध्ये ७८ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ८४.७२ टक्के मतदान झाले हाेते. पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण उत्साहित हाेते. भाजपचे उमेदवार हिमंता बिस्व शर्मा यांचा १९ वर्षीय मुलगा नंदील याने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी इतरही तरुणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमदारांनी स्थानिक प्रश्न प्राधान्याने साेडवावे, असे मत प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणाईने मांडले. सीमापार मतदान केंद्रआसाममधील ढुबरी जिल्ह्यातील एक मतदान केंद्र भारत-बांगलादेश सीमेपलीकडे हाेते. सीमेलगत ६३ मतदान केंद्र असून भाेगदंडा येथील हे एकमेव केंद्र सीमेपलिकडे आहे. याठिकाणी ३८६ मतदार असून जवळपास सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. गाैरीपूर मतदारसंघातील या मतदारांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सीमेवरील फाटक उघडण्याची वाट पाहावी लागते. तृणमूल नेत्याच्या घरी सापडले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट; एक निलंबितकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत मंगळवारी मतदान सुरू असताना हावडा येथील उलुबेरियात (उत्तर) तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडले. याप्रकरणी एक अधिकारी निलंबित केला गेला. उलुबेरियामधील (उत्तर) भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी तुलसीबेरियाचे तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांना लोकांनी ईव्हीएम आणि ४ व्हीव्हीपॅटसह पकडले, असा आरोप केला. त्यानंतर परिसरात तणाव पसरल्याचे ते म्हणाले. केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर लाठीमारही करावा लागला. या घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रारंभीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशीनपैकी वाटत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, त्याचा अहवाल लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले.देवी-देवतांचा मुद्दा पुन्हा चर्चेत केरळमध्ये १४० जागांसाठी मतदान झाले. सुमारे ७३.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७७.५३ टक्के मतदानाची नाेंद झाली हाेती. यावेळी मतदान घटले आहे. राज्यात काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा प्रत्येक पक्षाने संपूर्ण प्रचारादरम्यान उचलला हाेता. मतदानाच्या दिवशीही हाच मुद्दा नेत्यांच्या ताेंडी हाेता.विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यापासून विराेधीपक्ष नेते रमेश चेन्नीथला यांनी अयप्पा व इतर देवी देवातांचा आशीर्वादआपल्यासाेबतच असल्याचा दावा केला.देवतांची नावे निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरल्यावरून केरळचे मंत्री ए. के. बालन यांनी निवडणूक आयाेगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर एनडीएचे कलमसेरी मतदारसंघातील उमेदवार पी.एस. जयराज यांनी बाेगस मतदान झाल्याच्या आराेपावरून मतदान केंद्रातच ठिय्या आंदाेलन केले. मतदानाचा टक्कासायंकाळी ६ वाजेपर्यंत आसाममध्ये सुमारे ८२ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७७.६८, तामिळनाडूत ६५.११, केरळमध्ये ७० आणि पुदुच्चेरीमध्ये ७८.१३ टक्के मतदान नाेंदविण्यात आले हाेते.पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ८० टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ८०.४३ टक्के मतदान नाेंदविण्यात आले हाेते. तिसऱ्या टप्प्यात मात्र ७७.६८ टक्के मतदान झाले आहे. आसाममध्येही पहिल्या टप्प्यात ७६ आणि दुसऱ्या टप्प्यात ७८ टक्के मतदान झाले हाेते. तिसऱ्या टप्प्यात मात्र ७७.६८ टक्के मतदान झाले आहे.मतदानासाठी सरसावले ‘स्टार’तामिळनाडूमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कमी मतदान नाेंदविण्यात आले. एकूण २३४ जागांसाठी ७० टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ७४.२६ टक्के मतदान झाले हाेते. यावेळी मतदानाचा टक्का घटला आहे. तामिळनाडूत शांततेत मतदान पार पडले. मतदान करण्यासाठी तामिळनाडूतील सिनेसृष्टी अवतरली हाेती. ‘काॅलीवूड’चे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत, कमल हासन, श्रुती आणि अक्षरा हासन, विजय, अजित कुमार, सूर्या शिवकुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला.अभिनेता विजय हा सायकलवर स्वार हाेऊन मतदान केंद्रावर पाेहाेचला. विरुधनगर येथे एका मतदान केंद्रावर कुठलेही बटन दाबल्यास एकाच उमेदवाराला मत जात असल्याचा आराेप करण्यात आला हाेता; मात्र निवडणूक आयाेगाने ताे फेटाळला.‘डीएमके’च्या खासदार कनिमाेळी यांना काेराेना झाल्यामुळे त्यांनी पीपीई किट घालून मतदान केले. याशिवाय इतरही काेराेना रुग्णांनी पीपीई किट घालून मतदान केले. त्यांच्या मतदानानंतर परिसर सॅनिटाईझ करण्यात आला.
Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:45 AM