'भाजपचा मोठा विजय, अशात I.N.D.I.A साठी...', ओवेसी यांनी निवडणूक निकालानंतर केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:35 PM2023-12-04T19:35:54+5:302023-12-04T19:36:55+5:30
या विधानसभा निकालानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व आणि अविस्मरणीय यश मिळाले आहे. या विधानसभा निकालानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदी भाषी राज्य मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान येथील निवडणूक निकालांमुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
खासदार ओवेसी म्हणाले, "भाजपचा मोठा विजय आहे. यामुळे, विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया' अलायन्ससाठी आता 2024 लोकसभेसाठी आव्हान आहे. तीन राज्यांचे आलेले निकाल 2024 मध्ये काँग्रेस पक्षासाठीही धोक्याची घंटा असू शकते. आम्ही छत्तीसगडमध्ये लढलो नाही आणि येथेही भाजपला विजय मिळाला."
येथे उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे, तेलंगाना विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमला सात जागांवर विजय मिळाला आहे. यात ओवेसी यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसींनीही चंद्रायनगुट्टा मतदार संघातून विजय मिळवला आहे.
कुठे कशी आहे भाजप आणि काँग्रेसची स्थिती? -
- मध्य प्रदेशात भाजपने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला आहे. येथे एकूण 230 जागांपैकी तब्बल 163 जागांवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर काँग्रेसला केवळ 66 जागांवरच विजय मिळवता आला आहे.
- राजस्थानात 199 जागांपैकी तब्बल 115 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसला 69 जागाच मिळाल्या आहेत. तर इतरांना 15 जागा मिळाल्या आहेत.
- छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथे 90 जागांपैकी भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत.
- तेलंगणातील जनतेने बीआरएसला नाकारत काँग्रेसच्या हाती राज्याची धुरा दिली आहे. येथे 119 जागांपैकी 64 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर बीआरएस 39 जागा मिळाल्या आहेत. या खेरीज भाजपला 8, एआयएमआयएमला 7 तर इतरांना 1 जागा मिळाल्या आहेत.