नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबरपर्यंत संपत्ती आणि देणीदारीबाबत दोन वर्षांचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकपाल कायद्यानुसार ही माहिती देणे बंधनकारक आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांना यासंदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने परिपत्रक पाठविले आहे. या परिपत्रकानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २०१४ पर्यंतची संपत्ती आणि देणीदारीचे विवरण आणि ३१ मार्च २०१५ पर्यंतचे दुसरे विवरण १५ आॅक्टोबरपर्यंत दाखल करावयाचे आहे.सर्व अधिकारी आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम आणि अन्य संस्थेतील अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, असे सचिवांना सांगण्यात आले आहे.लोकपाल कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी ३१ जुुलैपर्यंत संपत्ती आणि देणीदारीचा तपशील सादर करावा लागतो. यात त्या वर्षी ३१ मार्चपर्यंतच्या तपशिलाचा समावेश असतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)२०१४ या वर्षासाठी विवरण दाखल करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर होती. नंतर ही मुदत डिसेंबरअखेर करण्यात आली. पुन्हा ३० एप्रिलपर्यंत आणि आता १५ आॅक्टोबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. या मुदतीपर्यंत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना विवरण दाखल करणे भाग आहे. देशभरात जवळपास ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना संपत्ती विवरण सक्तीचे
By admin | Published: July 31, 2015 2:19 AM