शिवलिंग हटविण्याचा निर्णय लिहिता लिहिता बेशुद्ध पडले असिस्टंट रजिस्ट्रार, न्यायमूर्तींनी निकालच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:08 PM2023-08-09T13:08:51+5:302023-08-09T13:09:33+5:30
कोलकाता उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकार घडला आहे. न्यायमूर्तीं जॉय सेनगुप्ता यांनी ते शिवलिंग हटविण्याचा निर्णय दिला होता.
कोलकाता उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकार घडला आहे. वादग्रस्त जमिनीच्या खटल्यावर निकाल देत असताना न्यायमूर्तींचा निकाल नोंदवत असताना असिस्टंट रजिस्ट्रार अचानक बेशुद्ध पडला, यामुळे न्यायमूर्तींनी तडकाफडकी निकालच बदलल्याचा प्रकार घडला आहे.
त्या जमिनीवरील शिवलिंग हटविण्याचा निर्णय न्यायमूर्तींनी दिला होता. परंतू, तो टाईप करत असताना असिस्टंट रजिस्ट्रार बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू, त्याची परिस्थिती पाहून इकडे न्यायमूर्तींची हालत वाईट झाली होती. त्यांनी तडकाफडकी त्या जागेतून शिवलिंग न हटविण्याचा निकाल देऊन टाकला. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीप पाल आणि मुर्शिदाबादमधील खिदिरपूर, बेलडांगा, येथील रहिवासी गोविंद मंडल यांच्यात जमिनीच्या तुकड्यावरून बराच काळ वाद सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता. यानंतर गोविंदाने वादग्रस्त जागेवर एका रात्रीत शिवलिंगाची स्थापना केली. याबाबत सुदीपने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने सुदीपने कोलकाता उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.
गोविंदाने वादग्रस्त जमिनीवर जाणूनबुजून शिवलिंग बसवल्याचे सुदीपच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. तर गोविंदाच्या वकिलांनी माझ्या अशिलाने शिवलिंगाची स्थापना केली नाही, तर शिवलिंग जमिनीतूनच निघाले आहे, असा युक्तीवाद केला. यावरून न्यायमूर्तीं जॉय सेनगुप्ता यांनी ते शिवलिंग हटविण्याचा निर्णय दिला.
न्यायाधीशांचा हा निर्णय नोंदवत असताना अचानक सहायक निबंधक विश्वनाथ राय बेशुद्ध पडले. हे पाहून न्यायमूर्तींनीही आपला निर्णय बदलला आणि हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात दिवाणी खटल्याद्वारे चालवावे, असे सांगितले.