घोटाळेबाज मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं पळाला; काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 06:37 PM2018-08-04T18:37:26+5:302018-08-04T18:38:56+5:30
पीनएबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं देशाबाहेर पळाला, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीची आज दुसरी बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. घोटाळेबाज मेहुल चोक्सीला पळून जाता यावं, यासाठी मोदी सरकारनं मदत केली, असं सुरजेवाला म्हणाले.
पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. यावरुन कालच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर आता काँग्रेस प्रवक्त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. 'घोटाळेबाजांना सुखनैव पळून जाता यावं, यासाठी मोदी सरकारकडून मदत केली जात आहे. चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व कसं मिळालं, हे आपण सर्व पाहातच आहोत. चोक्सीला पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं कशी मदत केली, याची माहिती आता समोर आली आहे,' असं काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले.
रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारसोबतच सेबीवरदेखील टीका केली. या प्रकरणात सेबीनं सकारात्मक अहवाल दिलाच कसा?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सेबीनं दिलेल्या अहवालामुळेच चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे. चोक्सीला देशाबाहेर पळून जाऊ देण्यात मोदी सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीदेखील फरार आहे.