रिओ दी जानेरिओ : अॅस्ट्राझेनिसा व ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तरीत्या विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रयोगांत ब्राझीलमधील एक स्वयंसेवक बुधवारी मरण पावला; पण त्याला कोरोना लस टोचण्यात आली नव्हती, असे आता सांगण्यात येत आहे. या घटनेनंतरही ब्राझीलमध्ये या लसीचे प्रयोग पुढेही सुरूच राहणार आहेत.
प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही हे प्रयोग यापुढेही सुरू राहणार आहेत.
ब्राझीलमध्ये मृत व्यक्ती डॉक्टर असून २८ वर्षांचा होता, असे वृत्त तेथील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. त्याला कोरोनाची लस टोचण्यात आली नव्हती, असेही त्यात म्हटले आहे. ही व्यक्ती नेमकी कोणत्या आजारामुळे मरण पावली हे अॅस्ट्राझेनिसा किंवा ब्राझीलच्या सरकारनेही अद्याप जाहीर केलेले नाही. लसनिर्मिती संदर्भातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्यात येते. त्यामुळे या लसीच्या चाचण्या पुढे सुरू ठेवण्यास काहीही अडचण नाहीत, असे अॅस्ट्राझेनिसाने म्हटले आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनलाही बसला फटकाजॉन्सन अँड जॉन्सन कंपनी अमेरिकेत विकसित करीत असलेल्या कोरोना लसीच्या प्रयोगादरम्यान एक स्वयंसेवक आजारी पडल्याने या चाचण्या काही काळ स्थगित करण्यात आल्या. अॅस्ट्राझेनिसा लसीची चाचणी यापूर्वी काही दिवस थांबविण्यात आली होती. जॉन्सन अँड जॉन्सन, इली लिली या कंपन्या अँटीबॉडीच्या करीत असलेल्या चाचण्या स्वयंसेवकांची तब्येत बिघडल्याने थांबविण्यात आल्या होत्या.