बेंगळुरू: जगभरात अनेकविध विषयांवरून विविध प्रकारची भाकिते केली जातात. आतापर्यंत कोरोनापासून ते एखाद्या पृथ्वीवरील प्रलयापर्यंत अनेकांनी भविष्यवाणी केली होती. काही भाकिते चर्चेचाही विषय ठरली होती. मात्र, आता देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण देशात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच बंगळुरू येथील एका मॅगझिनमध्ये करण्यात आलेली एक भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मॅगझिनने एक वर्षापूर्वीच देशातील बड्या व्यक्तीच्या मृत्यूची भविष्यवाणी वर्तवली होती.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथे भारतीय वायूदलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्क समोर आले आहेत. वर्षभरापूर्वी बंगळुरूमधील एका मॅगझिनने देशातील दोन बड्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात भाकित केले होते. बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर हा लेख व्हायरल होत आहे.
नेमकं काय म्हटलंय या लेखात?
बंगळुरूमधील मॅगझिनने केलेली आधुनिक ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच्या संपादिका गायत्री वासुदेव आहेत. गायत्री वासुदेव यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, देशातील दोन बड्या नेत्यांच्या जीवाला धोका असू शकतो. (जे लष्करप्रमुखही असू शकतात). २५ जुलै रोजी केतु अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसेच २६ मे २०२१ ते ४ डिसेंबर २०२१ हा ग्रहणांचा सर्वात संवेदनशील कालावधी आहे. या काळात गुन्हेगारी डोके वर काढू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी सुरक्षा वाढवली जाऊ शकते, असेही भाकित या लेखात वर्तवण्यात आले आहे. सीडीएस प्रमुख बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर हा लेख चर्चेत आला आहे. हा लेख नोव्हेंबर २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.
कोण आहेत गायत्री वासुदेव?
गायत्री वासुदेव यांच्या ज्योतिषविद्येचा देशातच नाही तर परदेशातही नावलौकीक आहे. गायत्री वासुदेव यांच्या भविष्यवाणीची केवळ भारतात नाही तर, जगभरात चर्चा आहे. गायत्री वासुदेव यांच्या या लेखाने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. अशी भाकिते किंवा भविष्यवाणी याकडे श्रद्धा म्हणून पाहायचे की अंधश्रद्धा म्हणून, हे ज्याचे त्याने ठरवावे. मात्र, बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर गायत्री वासुदेव यांचे भाकित प्रकाशझोतात आले आहे, हे नक्की!