मुंबई: चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात थोडक्यात अपयशी ठरल्यानंतर आता इस्रोनं गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. गगनयान भारताचं अंतराळातलं पहिलं मानवी मिशन असल्यानं इस्रोनं यासाठी अतिशय काळजीपूर्वक तयारी सुरू केली आहे. अंतराळवीरांसाठी म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं विशेष खाद्यपदार्थ तयार केले आहेत. अंतराळाचा अभ्यास करुन या खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे.डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं अंतराळवीरांसाठी एग रोल, व्हेज रोल, इडली, मूग डाळ हलवा आणि व्हेज पुलाव हे पदार्थ तयार केले आहेत. याशिवाय अंतराळवीरांसाठी विशेष ज्युसदेखील तयार केले गेले आहेत. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं. त्याचा संपूर्ण विचार करून या पदार्थांची आणि पेयांची निर्मिती करण्यात आली आहे. मिशन गगनयानसाठी विशेष भांडी आणि अन्न गरम करण्यासाठी फूड हिटरदेखील तयार केले आहेत. इस्रो प्रमुख के. सिवन यांनी १ जानेवारीला मिशन गगनयानवर भाष्य केलं होतं. गगनयान मोहीम आता आमचं प्राधान्य असेल, असं सिवन यांनी म्हटलं होतं. भारताचं गगनयान २०२२ मध्ये अवकाशात झेपावेल. या मोहिमेसाठी हवाई दलातील ४ जणांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते रशियात प्रशिक्षण घेत आहेत. या चारही जणांनी भारत आणि रशियात वैद्यकीय चाचणी दिली असून त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत. मिशन गगनयान इस्रोची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम मानली जाते.