लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये जनावरांची चरबी वापरण्यात आल्याच्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यावर सर्वाेच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच किमान देवांना राजकारणाबाहेर ठेवा, असे सांगून या मुद्द्यावरून राजकारण हाेत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. लाडू बनविताना जनावरांची चरबी वापरल्याचा पुरावाही न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे मागितला.
लाडूप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात विविध याचिकांवर न्या. बी. आर. गवई आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. त्यापैकी काही याचिकांमध्ये याप्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकांवर जवळपास तासभर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा की स्वतंत्र तपास यंत्रणेकडून, याबाबत महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सल्ला द्यावा, असे न्यायालयाने सांगून पुढील सुनावणी दि. ३ ऑक्टाेबरला दुपारी ठेवली.
उत्तर देण्यापूर्वी विचार करा, व्यापक परिणाम हाेईल : टीटीडी वकिलांना कोर्टाने सुनावले‘टीटीडी’चे कार्यकारी अधिकरी यांनी पत्रपरिषद घेऊन सांगितले हाेते की, भेसळयुक्त तूपाचा वापर केलाच नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तपासणीसाठी नमुने पाठविले. मात्र, प्रसादामध्ये या तुपाचा वापर केला की नाही, हे स्पष्ट हाेत नाही. मात्र, तुमचा अधिकारी म्हणताे की, केलेला नाही. यावर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, ती एक बातमी हाेती. यावर न्यायालयाने म्हटले की, उत्तर देण्यापूर्वी विचार करा, कारण याचा फार व्यापक परिणाम हाेईल. तुमच्याकडे आज काेणतेही उत्तर नाही. भेसळयुक्त तूप वापरले नाही, हे अहवालातून स्पष्ट होते. तुम्हाला खात्री नव्हती, तर तुम्ही कसे काय जाहीरपणे बोललात? असेही कोर्ट म्हणाले.
भेसळयुक्त तूप वापरल्याचा पुरावा काय?तिरुपती मंदिराची बाजू मांडणारे वकील सिद्धार्थ लुथरा यांना न्यायालयाने विचारले की, लाडू तयार करताना भेसळयुक्त तूप वापरले हाेते, याचा पुरावा काय? त्यावर लुथरा म्हणाले की, आम्ही तपास करीत आहाेत. न्या. गवई यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की, तुम्हाला लगेच माध्यमांसमाेर जायची काय गरज हाेती? तुम्हाला धार्मिक भावनांचा सन्मान करायला हवा.
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांवर कोर्टाची प्रश्नांची सरबत्तीसुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नाेंदविताना म्हटले की, मुख्यमंत्री नायडू यांनी दि. १८ सप्टेंबर राेजी दावा केला. दि. २५ सप्टेंबर राेजी गुन्हे दाखल करण्यात आले आणि दि. २६ सप्टेंबरला एसआयटी स्थापन करण्यात आली.उच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने जनतेसमाेर जाऊन काेट्यवधी लाेकांच्या भावनांवर परिणाम हाेईल, अशी वक्तव्ये करणे अयाेग्य आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. प्रयोगशाळेचा अहवाल जर जुलै महिन्यातच आला होता, तर राज्य सरकारने आताच त्यासंदर्भात खुलासा का केला, असेही न्यायालयाने विचारले.
टीडीपी म्हणतो, माघार नाही, केंद्रीय तपासासाठी तयार सर्वाेच्च न्यायालयाने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आंध्रातील सत्ताधारी टीडीपीने स्पष्ट केले की, लाडवाच्या मुद्द्यावर जनतेसमाेर जे काही म्हटले, त्यावर पक्ष ठाम आहे. आम्ही माघार घेणार नाही. भेसळयुक्त तूप वापरल्याचे आमच्याकडे पुरवे आहेत. ते न्यायालयात सादर करु. राज्याची एसआयटी तपास करीत असली, तरी केंद्रीय तपासासाठीदेखील आम्ही तयार आहाेत.