केरळच्या वायनाडमध्ये मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना वायनाडमध्ये भूस्खलन झाले असून मातीच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक लोक अडकले आहेत. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास हे भूस्खलन झाले आहे.
पहाटे सव्वा चार वाजता पुन्हा एकदा भूस्खलन झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या भूस्खलनामध्ये जखमी झालेल्या १६ लोकांना वायनाडच्या मेप्पाडीमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सीएमओनुसार राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रुम स्थापित केला आहे. मदतीसाठी 9656938689, 8086010833 हे मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या सुलूर तळावरून वायनाडला मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत.
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती घेतली असून मंत्र्यांना घटनास्थळाचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारी यंत्रणांना बचावकार्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने थामरसेरी घाटातून अनावश्यक वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व मदत लवकर पोहोचावी यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.