नवी दिल्ली - विवाह सोहळ्यामध्ये नेहमीच अजब गजब घटना, वाद विवाद झाल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमधील एका लग्नसोहळ्यामध्ये घडली आहे. येथील एका लग्न सोहळ्यामध्ये नवरा आणि नवरीमध्ये असे काही घडले की, लग्नसोहळ्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. लग्नसोहळ्यादरम्यानच वराने नववधूच्या श्रीमुखात मारली. त्यानंतर संतापलेल्या वधूने तिच्याच चुलत भावासोबत लग्न केले.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वधू ही पनरुती येथील रहिवासी आहे. तर वर हा पेरियाकट्टुपलायम येथील राहणारा होता. दोघांचा साखरपुडा ६ नोव्हेंबर रोजी झाला होता. तर विवाह सोहळा २० जानेवारी रोजी कमपुलियुर गावामध्ये होणार होता. दोघांचे रिसेप्शनचा कार्यक्रम १९ जानेवारी रोजी होत होता.
लग्नामध्ये सारे काही सुरळीत सुरू होते. वधू-वरांनी डीजेवर जोरदार डान्स केला. मात्र वधूचा चुलत भाऊ नवदाम्पत्याचा हात धरून डान्स करू लागला आणि चित्र बिघडले. डान्स करता करता त्याने वराच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे वर चिडला आणि त्याने वधू आणि तिच्या चुलत भावाला धक्का दिला.
वधूच्या कुटुंबाने सांगितले की, जेव्हा वधू स्टेजवर आली तेव्हा वराने सर्वांसमोर तिला मारले. त्यामुळे वाद एवढा वाढला की, वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वधूच्या निर्णयाला तिच्या आई-वडिलांनीही पाठिंबा दिला. वधूच्या कुटुंबीयांना नातेवाईकांमध्येच अनुरूप वर मिळाला. त्यानंतर त्यांनी निर्धारित मुहुर्त आणि वेळेत त्यांनी मुलीचा विवाह सोहळा पार पाडला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात नाकारल्या गेलेल्या वराने पनरुती येथील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, वधूच्या कुटुंबीयांनी त्याला धमकावले. तसेच विवाह सोहळ्यामध्ये त्याच्यासोबत गैरवर्तन करून मारहाण केली. वराने लग्नामध्ये खर्च झालेले सात लाख रुपये आणि नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.