नवी दिल्ली : माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त गुरुवारी संध्याकाळी आले आणि देशभर शोककळाच पसरली. जी बातमी ऐकायची इच्छा नव्हती, ती अखेर ऐकावीच लागली. आपली दुवा कामाला आली नाही, याचे कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना प्रचंड दु:ख दिसत होते. त्यामुळे सामान्यांनीही हंबरडा फोडल्याचे चित्र राजधानीत पाहायला मिळाले. अनेक जण तर धाय मोकलून रडत होते. सर्वांना आपलासा वाटेल, असा नेता आता पु्न्हा पाहायला मिळणार नाही, याचे ते दु:ख होते.हे देशभर पाहायला मिळाले. अगदी तामिळनाडू, तेलंगणा, केरळपासून थेट ईशान्येकडील राज्यांमध्येही स्त्री-पुरुष रडताना दिसत होते. त्यांनी भले कधीही भाजपाला मते दिली नसतील, पण त्यांचे वाजपेयी यांच्यावर कमालीचे प्रेम होते. ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष कधीही पाहिले नाही, तेही शोकसागरात बुडाले होते.समाजमाध्यमेही दु:खाच्या संदेशांनी भारावून गेली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त टीव्ही वाहिन्यांबरोबरच व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून लगेचच देशभर पसरले आणि दु:खाच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या. अलीकडील काळात अन्य कोणत्याही नेत्याविषयी लोकांना इतके भरभरून बोलताना पाहायला मिळाले नव्हते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी यांच्याइतकी लोकप्रियता मिळविणारे ते भाजपाचे बहुधा पहिलेच नेते म्हणता येतील. अगदी त्यांचे राजकीय विरोधकही ते मान्य करीत. त्यामुळेच अन्य पक्षांनीही आपले कार्यक्रम रद्द केले.त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अनेक राज्यांनी उद्या, शुक्रवारी सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांना ‘पतेती’ची रजाच आहे. पण बिहारपासून ओडिशापर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत सर्वत्र उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारची दिल्लीतील कार्यालयेही उद्या अर्धा दिवस बंदच राहणार आहेत.श्रद्धांजलीवाजपेयी यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. ते सच्चे भारतीय मुत्सद्दी राजकारणी होते. नेतृत्वगुण, दूरदृष्टी, प्रगल्भता आणि ओघवती वाणी यामुळे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. मृदू स्वभावाच्या अटलजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची उणिव सर्वांनाच जाणवत राहील. - - रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीअटलजी एवढ्या लवकर जातील, असे वाटले नव्हते. ते सच्चे भारतीय होते. मनात असेल ते बोलण्यास ते कधीच कचरले नाहीत. ते स्वातंत्र्योत्तर भारतातील उत्तुंग नेते होते. नेहमीच आब आणि प्रतिष्ठा राखल्यानेच ते आधुनिक काळातील अजातशत्रू ठरले. अभाविपचा कार्यकर्ता असताना त्यांच्या वक्त्तृत्वाने प्रभावित होऊनच मी राजकारणात प्रवेश केला.- एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलेअटलजींच्या चिकाटीतून आणि संघर्षातून भाजपाच्या बांधणीची प्रत्येक वीट रचली गेली. त्यांचे जाणे हा एका युगाचा अस्त आहे. त्यांनी संपूर्ण आयुषय देशासाठी वेचले आणि अथक देशसेवा केली.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
वाजपेयीजी दीर्घकाळ आजारी होते पण ते जातील, असे वाटले नव्हते. नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांचे सर्वांश्ी चांगले पटायचे. विरोधी पक्षात असताना त्यांनी विवेकी विरोधकाची भूमिका बजावली तर पंतप्रधान म्हणून त्यांनी नेहमीच सर्वसहमतीचा ध्यास घेतला. वाजपेयीजी हाडाचे लोकशाहीवादी होते. भारताच्या या थोर सुपुत्राच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे.-प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती
वाजपेयी अप्रतिम वक्ते, प्रभावी कवी, अव्दितीय लोकसेवक, अतुलनीय संसदपटू व थोर पंतप्रधान होते. ज्यांनी देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचले अशा आधुनिक भारताच्या उच्चतम नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. वाजपेयीजींनी देशासाठी केलेले काम दीर्घकाळ स्मरणात राहील.- डॉ. मनमोहन सिंग,माजी पंतप्रधान
एक निकटतम मित्र गमावल्याचे मला अतीव दु:ख आहे. संघ प्रचारक, जनसंघातील सुरुवातीचे कार्यकर्ते, आणिबाणीच्या काळ््या कालखंडातील सहयोगी व भाजपाच्या जन्माचे साक्षीदार या सर्व आठवणी न विसरता येणाऱ्या आहेत. पहिले काँग्रेसेतर आघाडीचे स्थिर सरकार चालविणारे पंतप्रधान ही त्यांची लक्षणीय उपलब्धी आहे. त्यांच्यासोबत सहा वर्षे उपपंतप्रधानपदी काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले.- लालकृष्ण आडवाणी, ज्येष्ठ नेते, भाजपाउत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि दूरदूरष्टी असलेल्या राष्ट्रभक्त नेत्याला आज आपण गमावले आहे. खासदार, कॅबीनेट मंत्री किंवा पंतप्रधान कोणत्याही भूमिकेत असताना वाजपेयी यांनी आयुष़्यभर लोकशाही मूल्यांशी असलेली बांधिलकी कायम जपली.- सोनिया गांधी, ज्येष्ठ नेत्या, काँग्रेसउमदं व्यक्तिमत्त्व गमावलंवाजपेयी यांच्या निधनामुळे आपण एक उमदं व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्ता, प्रतिभासंपन्न कवी, आदर्श माणूस आणि सर्वोत्तम सांसद गमावला आहे. संसदेत त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केल्यानंतर आज अटलजींच्या निधनाने माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. वाजपेयीजींना भावपूर्ण श्रद्धांजली!- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसअटलजींच्या हृद्य आठवणी मनात कायम राहतील. वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांचे व्यक्तिमत्व राजस होते. त्यांचे सरकार पडणार होते तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आणि आजच्या राजकारणासारखी नव्हती.- ममता बॅनर्जी,मुख्यमंत्री, प. बंगाल
स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटलबिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते. त्यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचे भाग्य मला लाभले. ते माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहे.- सी.विद्यासागर राव, राज्यपालश्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शांपैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीअटलजी यांच्या निधनाने सर्वांचीच कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे. अटलजी हे विद्यार्थीदशेपासूनच माझे आदर्श राहिले आहेत. पंतप्रधान सुवर्ण चतुर्भुज रस्ते योजना आणि पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना राबविताना मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी भाजपचा अध्यक्ष बनलो, तेव्हाही मला अटलजींकडून भावनात्मक जबाबदारीचा अनुभव मिळाला. आम्ही आमचे सरकारही त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. संसदेतील दोन सदस्यांपासून तर भाजपाला बहुमतापर्यंत पोहचवण्यात अटलजींचे प्रेरणादायी नेतृत्व आणि आशीर्वाद यामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. ते महानायक आणि अजातशत्रू होते. ते आम्हा सर्वांमध्ये आत्मबलाच्या रूपाने अटल आहेत आणि राहतील.- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,जहाज बांधणी व जलसंपदा मंत्रीमहान दार्शनिक तथा अष्टपैलू व अजातशत्रू व्यक्तिमत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशाने कुशल राजनितीज्ञ, तत्वचिंतक व समरसतेचा अविरत मूलमंत्र जपणारा मातृहृदयी नेता गमावला असून अटलजींच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झालीआहे.- हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्रीएक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतीक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींच्या जाण्याने एका ध्यासपर्वाची अखेर झाली आहे. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत.- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्रीअटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला. मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री स्व. शंकरारव चव्हाण यांच्याशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.-अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसअटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील. अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन्मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे एनडीए मजबूत राहिली. त्यांच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. अटलजी! तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखस्व. बाळासाहेब विखे यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतिमा असलेले नाणे काढण्याबाबत मागणी केली होती. वाजपेयींनी ती मागणी तातडीने मंजूर केली आणि त्या नाण्याचे नवी दिल्लीत थाटामाटात अनावरण करण्यात आले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले आहे.- राधाकृष्ण विखे,विरोधी पक्षनेते, विधानसभाअटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे, परंतु सात्विक माणसे देशातून कमी होत आहेत. वैयक्तिक जीवनात त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता. त्यांनी निष्काम कर्मभावनेने देशाची सेवा केली. एक आदर्श संसदपटू कसा असावा याचे ते ज्वलंत उदाहरण होते. राजकारण कसे करावे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. पंतप्रधान होण्यापूर्वी व पंतप्रधान झाल्यावर त्यांची व माझी अनेकदा भेट होत असे. ते पंतप्रधान असताना त्यांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलावले होते.माझ्यासारख्या फकीर माणसाची ते नेहमी विचारपूस करीत असत. राजकारण व समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू त्यांच्या जीवनकार्यात दिसून येतात.-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवकआपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी पंतप्रधान, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व गमावले. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनसंघ आणि पुढे भाजपाला दिशा देणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख कायम राहील. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री
सर्वोत्तम पंतप्रधानांंपैकी एकआपण एक महान राजकारणी, दूरदर्शी विचारक आणि शांततेचा संदेश घेऊन सत्याची ज्योत वाहून नेणारा राजकीय नेता गमावला आहे. ते पंतप्रधान आणि मी संसदेचा सदस्य असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. यवतमाळ येथील माझ्या घरी त्यांच्यासोबत झालेली भेट अतिशय स्मरणीय होती. त्यांच्या निधनानंतर, आम्ही देशाचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व व प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. नि:संदेह सर्वोत्तम पंतप्रधानांंपैकी ते एक होते. त्यांनी कठीण परिस्थितीत देशाचे नेतृत्त्व केले, हे आमचे भाग्य आहे. देशवासीयांनी ज्यांना प्रेमाने अटलजी संबोधले होते, त्यांचे नेहमीच महान नेत्यांपैकी एक म्हणून स्मरण केले जाईल. त्यांनी नेहमीच राष्ट्राला स्वत:च्या आधी ठेवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.- माजी खासदार विजय दर्डा,अध्यक्ष, लोकमत एडिटोरियल बोर्ड.वाजपेयी यांच्या निधनाने माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माझ्यासाठी वाजपेयी वडिलांसमान होते. त्यांनीही मला मुलगी मानले होते. त्यांच्या अतिशय साध्या व्यक्तिमत्वामुळे आमच्यात छान ऋणानुबंध निर्माण झाले होते. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणून हाक मारायचे. आज मला इतकं दु:ख झालंय जितकं मला माझ्या वडिलाचं निधन झालं होतं तेव्हा झालं होतं. अतिशय तरल, हळवा कवीमनाच्या माणसाला आपण गमावलं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.-लता मंगेशकर, गानसम्राज्ञी