नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीच्या कार्यकाळात भारतानं एक यशस्वी पाऊल उचललं. 1995च्या वाजपेयी सरकारनंतर 1996 ते 98दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवैगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे फार काळ टिकली नाहीत. त्यानंतर 1998च्या निवडणुकांत भाजपा पुन्हा सत्तेचा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापलं. परंतु 1998च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला आणि वाजपेयी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारतात पुन्हा लोकसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. 1998मध्ये रालोआचं सरकार असताना वाजपेयींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे अमेरिकेला हा मोठा धक्का होता. कारण भारतानं या चाचण्या अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या उपग्रहाला चुकवून केल्या होत्या. त्यानंतर 2 आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी घेतलेल्या अणुचाचण्यांचं समर्थन केलं, तर अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपिय महासंघानं भारताच्या चाचण्यांना विरोध दर्शवून अनेक निर्बंध लादले. परंतु वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला याचा फारसा फटका बसला नाही.
या पोखरणच्या अणुचाचण्या भाजपा आणि वाजपेयींसाठी फायदेशीर ठरल्या. अटलजींच्या पंतप्रधानपदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. इंदिरा गांधींनंतर अणुचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ठरले होते. जय जवान, जय किसानसह वाजपेयींनी जय विज्ञान असा नवा नारा देशाला बहाल केला होता. भारताला अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यात वाजपेयींचा मोठा वाटा होता. जागतिक दबाव आणि निर्बंधाची त्यांनी कधीही तमा बाळगली नव्हती. त्यामुळेच भारताला एवढं मोठं यश मिळवता आलं. पाकिस्तान, चीन या सारखे बेभरवशाचे शेजारी देश असताना अण्वस्त्र सज्ज होणं ही भारताची गरज होती. अणुचाचणी घेऊन वाजपेयींनी अख्ख्या जगाला भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखवून दिले.