जयपूर - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. राजस्थानमध्ये त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. मात्र या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
न्यूज 18च्या वृत्तानुसार जयपूर, जोधपूरसहीत संपूर्ण शहरात अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधानाचे वृत्त व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नसताना लोकांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवातही केली. यापूर्वी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिकांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदवली. यानंतर जिल्हाधिका-यांनी शाळेचे प्राध्यापक कमलकांत दास यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी आजारी आहेत. अशातच वारंवार त्यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे भाजपा सूत्रांकडून सांगण्यात आले असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही करण्यात आले आहे. तसेच खात्री केल्याशिवाय असे मेसेज पाठवू नका फॉरवर्ड करू नका असेही भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.