नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीतील सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. उत्तर प्रांतातील बाटेश्वर येथून वाजपेयी यांचे आजोबा पं. श्यामलाल ग्वाल्हेरजवळील मोरेना येथे स्थलांतरित झाले होते. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे उत्तम कवी आणि शिक्षक होते. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून अटलबिहारी यांनी पदवी संपादित केली, त्यांना हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयांत प्रावीण्य मिळाले होते. सध्या या महाविद्यालयाचे नाव लक्ष्मीबाई महाविद्यालय असे आहे. त्यानंतर त्यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात निष्णात पदवी मिळवली. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. त्यांच्यावर बाबासाहेब आपटे यांच्या शिकवणीचा विशेष प्रभाव होता.
१९४७ साली वाजपेयी संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते पांचजन्य, स्वदेश, वीर अर्जुन, राष्ट्रधर्म या दैनिकांसाठी काम करू लागले. १९४२मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात २३ दिवस कारावास भोगला होता. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रभावामुळे जनसंघाचे काम करू लागले. १९५७ साली बलरामपूर मतदारसंघातून ते लोकसभेत गेले. तेव्हा त्यांच्या वक्तृत्वाने पं. नेहरूही प्रभावित झाले होते. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यावर वाजपेयी यांनी त्याविरोधात भूमिका घेऊन विशेष कार्य केले होते. १९७७ साली जनसंघ जनता पार्टीत विलीन झाल्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार केंद्रात सत्तेत आले होते. या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीत भाषण करणारे ते पहिले नेते ठरले.
१९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. काँग्रेसेतर सरकार देशात प्रथमच इतका काळ स्थिरपणे सत्तेत राहिले.