नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता. अटलबिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीयेत. अनेक गंभीर आजारांशी अनेक वर्ष लढा देत अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. त्यांच्या अनेक गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषण म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी रामलीला मैदानात केलेलं भाषण.
वाजपेयी यांना खऱ्या अर्थाने देशाचे लोकनेता म्हणता येईल. ते त्या मोजक्याच नेत्यांपैकी एक होते ज्यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली जात होते. हिंदी भाषेवरील त्यांच्या प्रभूत्वामुले ते त्यांच्या भाषणात अशा काही शब्दांचा प्रयोग करायचे की, त्यांचं भाषण ऐकणारी जनता भारावून जायची. विरोधीपक्ष नेता म्हणून केलेलं भाषण असो, संयुक्त राष्ट्र संघात केलेलं भाषण असो ते परिस्थितीनुसार आपल्या भाषणात शब्दांचा प्रयोग करायचे.
१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. विरोधी पक्षांनी याचा जोरदार विरोध केला होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. आणि १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यावर दिल्लीतील रामलीला मैदानात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये अटलबिहारी वाजपेयी होते. ते भाषण देण्यासाठी येताच उपस्थित हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला होता.
अटलबिहारी वाजपेयी यांनी गर्दीला शांत राहण्याचा इशारा केला. त्यानंतर आपल्या खास अंदाजात त्यांनी थोडा वेळ घेत ते म्हणाले 'बाद मुद्दत मिले हैं दिवाने'. यानंतर त्यांनी थोडा पॉझ घेतला आणि आपले डोळे काही वेळासाठी बंद केले. यावेळी रामलीला मैदानातील जनता जोरजोरात नारे लावू लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाजपेयी यांनी डोळे उघडून लोकांना शांत राहण्याचा इशारा केला. पुढे म्हणाले, 'कहने सुनने को बहुत हैं अफसाने'. हे ऐकल्यावर पुन्हा एकदा मैदानातील लोक जोरजोरात नारे देऊ लागले होते. पुढे वाजपेयी आपल्या ओळी पूर्ण करत म्हणाले की, 'खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी भला कौन जाने'.
या तीन ओळींमध्ये वाजपेयी यांनी आणीबाणी संपल्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर जमलेल्या लोकांनी इतके नारे लावले की, वाजपेयी आणखी काही बोलण्याची गरजच पडली नाही. यावरुनच वाजपेयी कशाप्रकारे शब्दांचे जादुगर होते आणि त्यांना ऐकल्यावर लोक कसे वेडे होते हे यातून बघायला मिळतं.