नवी दिल्ली - भारतीय राजकारणातील अजातशत्रू नेते, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न किताबाने गौरविण्यात आलेले भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी यमुना तीरावर पंचत्वात विलीन झाले. दिल्लीच्या राष्ट्रीय स्मृतिस्थळावर संपूर्ण राजकीय सन्मानासह, लष्करी इतमामात आणि मंत्रोच्चारांच्या घोषात वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा तेथील वातावरण शोकाकूल झाले होते. पंतप्रधान मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच भाजपासह जवळपास सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.भारताच्या या लाडक्या दिवंगत लाडक्या नेत्याला देशाच्या तिन्ही सैन्यदलांनी या वेळी ३00 फैरी झाडून सलामी दिली. त्या आधी तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करून माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. वाजपेयी यांच्या पार्थिवाभोवती गुंडाळलेला तिरंगा ध्वज सैन्यदलाने वाजपेयींची कन्या निहारिका यांच्या हाती सोपविला. त्या आधी तिन्ही सेना दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर, विविध देशांचे प्रतिनिधी, तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा अनेकांना अश्रूही आवरता आले नाहीत. या नेत्याला यापुढे पाहता येणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. नात निहारिका व भाची यांच्या अश्रूंचा बांधच फुटल्याने सर्वच जण अस्वस्थ झाले होते.अडवाणी झाले भावनाविवशभूतानचे नरेश जिग्मे खेसर, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजाई, बांगला देशचे परराष्ट्रमंत्री अबूल हसन महमूद अली, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार, श्रीलंकेचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री तिलक मारापना यांच्यासह माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, तसेच देशातल्या मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण केली. लालकृष्ण अडवाणी तर या वेळी खूपच भावनाविवश झाले होते. त्यांचे डोळे पुरते पाणावले होते.पक्षाच्या मुख्यालयात वाजपेयींचे पार्थिव हलविण्यात आले. समाजवादी नेते मुलायमसिंग, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रमुकचे नेते ए.राजा, काँग्रेस नेते दिग्विजयसिंग, गुलाब नबी आझाद, अशोक गेहलोत यांसह अनेक मान्यवरांनी व सामान्य दिल्लीकर जनतेने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दिल्लीस्थित ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालय, मॉरिशससह अनेक देशांच्या दूतावासांनीही वाजपेयींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपले राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविले होते.पोलिसांची धावपळ : भाजपाच्या पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील मुख्यालयातून वाजपेयी यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा पंतप्रधान मोदींसह भाजपाचे सारेच नेते त्यासोबत चालत निघाले होते. हे सुमारे चार किलोमीटरचे अंतर कापत असताना सुरक्षा दलाच्या जवानांनी फारच धावपळ उडाली. मोदी यांनी आपले सुरक्षा कवच न घेताच, अंत्ययात्रेत चालण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले. त्यामुळे साध्या वेशातील अनेक पोलीस व अधिकारी त्यांच्या आगेमागे होते. रस्त्यावरही वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घ्यायला झुंबड उडाली होती. अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या जवळ त्यांनी घुसू नये, यासाठी सुरक्षा दलाचे प्रयत्न सुरू होते.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री पीयूष गोयल, यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया अन् विविध राज्यांचे मंत्री स्मृतिस्थळावर जमलेल्या जनसागरात उपस्थित होते.मैं नि:शब्द हूंअटलजींना आदरांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, वाजपेयींचे निधन म्हणजे पित्याचे छत्र शिरावरून उठण्यासारखे आहे. अंत्ययात्रेपूर्वी टिष्ट्वटद्वारे पंतप्रधान म्हणाले...‘मैं नि:शब्द हंू, शून्य में हूं,लेकीन भावनाओंका ज्वारमनमें उमड रहा है।हम सभी के श्रध्देय अटलजीहमारे बीच नहीं रहे।मेरे लिए यह निजी क्षती है।अपने जीवन का प्रत्येक पलउन्होंने राष्ट्र को समर्पित किया।उनका जाना एक युग का अंत है।रस्त्यांवर शुकशुकाटदुपारी २ वाजता भाजपाच्या मुख्यालयापासून राजघाटाच्या जवळील स्मृतिस्थळापर्यंत ४ किलोमीटर अंतराची, वाजपेयींची विशाल अंतिम यात्रा पायी निघाली. आयटीओपासून दिल्ली गेटवर यात्रा पोहोचेपर्यंत लाखो लोक अंत्ययात्रेत सामील झाले. अंत्ययात्रेचे थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्यांवर सुरू होते.सारा देश या वेळी या महान नेत्याला अखेरचे अभिवादन करीत होता. जड अंत:करणाने नि:शब्द व शोकाकूल वातावरणात सारे लोक पायी चालत होते. अंत्ययात्रेच्या मार्गाखेरीज दिल्लीतल्या बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट होता. वाजपेयींना आदरांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीतल्या व्यापारी वर्गाने आपली दुकाने व व्यवहार शुक्रवारी बंद ठेवले होते. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट होता.
अटलजी अनंतात विलीन, माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 5:55 AM