ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू व कविमनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रोटोकॉल मोडून वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. आज दिल्लीत वाजपेयी यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकप्रिय नेत्याला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजकीय शिष्टाचार मोडून संध्याकाळी साडे चारच्या सुमारास वाजपेयींच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह व वाजपेयी यांचे जवळचे नातेवाईक अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाजपेयी यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो हे माझे भाग्यच आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. राष्ट्रपतींनी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे असे मोदींनी सांगितले.
अजातशत्रू वाजपेयींची कारकिर्द
५ डिसेंबर १९२४ साली ग्वाल्हेर येथे जन्मलेले वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवले आहे. अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची अमलबजावणी करण्याचे कामही त्यांनी केले. तसेच दिल्ली-लाहोर दरम्यान बससेवा सुरू करून भारत- पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. उत्कृष्ट वक्ता आणि कवि मनाचा नेता अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मने जिंकली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील नेत्यांशीही वाजपेयी यांचे चांगले संबंध होते.संसदेत वाजपेयी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांवर विरोधकांनीही दाद दिली आहे. संघाच्या तालमीत घडलेले वाजपेयी हे धर्मनिरपेक्ष नेते म्हणून प्रसिद्ध आहेत हेेदेखील एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.