पुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विज्ञानाची आवडच नव्हे तर आदर होता अशा शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी माशेलकर यांनी त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या.
माशेलकर म्हणाले की, वाजपेयी यांनी शास्त्रज्ञांना प्रचंड प्रोत्साहन दिले. जय जवान आणि जय किसानच्या बरोबरीने त्यांनी जय विज्ञान आणून विज्ञानाचा दृष्टिकोन देशवासीयांमध्ये रुजवला.मी त्यांना वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून न बघता युगपुरुष म्हणून बघितले. १९९८साली ११ मे रोजी त्यांच्या नेतृत्वकाळात त्यांनी पोखरणची अणुचाचणी घेण्याचे धैर्य दाखवले. त्याच दिवशी डीआरडीओ'ने एक क्षेपणास्त्र लॉन्च केले आणि त्याच दिवशी हंसा आकाशयानाचे उड्डाण करण्यात आले. त्यामुळे तो दिवस तंत्रज्ञान दिवस म्हणून वायपेयी यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि काही क्षणात त्यांनी तो मान्यच नाही तर जाहीरही केला. त्यांच्यासोबत दिल्लीत घालवलेला साडेअकरा वर्ष माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता.