नवी दिल्ली - आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची घोषणा एम्स रुग्णालयाने संध्याकाळी साडेपाच वाजता बुलेटिनद्वारे केली. त्यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला असून, आज, शुक्रवारी संध्याकाळी सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येतील.
अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नेण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी दिवसभर भाजपा दिल्लीतील मुख्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वाजता अंत्ययात्रा सुरू होईल आणि ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.आयुष्यभर अविवाहित राहिलेले अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्टवक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांबाबतही मित्रत्वाची भावना जपून, त्यांचा मानसन्मान करीत. ते सर्वार्थाने सर्वमान्य नेता होते. त्यांच्या निधनाने भारतातील अटलपर्वाचाच अस्त झाला आहे, असा सर्वमान्य नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे.गेले ९ आठवडे एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या वाजपेयी यांची प्रकृती बुधवारपासून बिघडत गेली. त्यामुळे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री व नेते काल लगेच एम्समध्ये धावून गेले. मात्र व्हेंटिलेटरवर (जीवरक्षक यंत्रणा) असलेल्या माजी पंतप्रधानांची प्रकृती बिघडतच गेली. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वांच्याच जिवात जीव आला.मात्र आज सकाळी प्रकृती बिघडत चालल्याचे वृत्त येताच, रुग्णालयात नेत्यांची रीघच लागली. भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा,काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, जवळपास सर्व केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, नवीन पटनाईक, शिवराजसिंग चौहान, रमणसिंग असे सारे मुख्यमंत्रीही दिल्लीकडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी हेही दुपारनंतर पुन्हा रुग्णालयात गेले. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, त्यात सुधारणा होत नाही, असेच रुग्णालयातर्फे सातत्याने सांगण्यात येत होते.त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याच्या बातम्यांमुळे भाजपाच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यांना मानणारे नेते व कार्यकर्ते सर्वच पक्षांमध्ये असल्याने तेही अस्वस्थ होते. पण त्याबरोबरच सर्वसामान्यांमध्येही चिंता दिसत होती. केवळ दवा नव्हे, तर दुवाही कामाला येते, या समजुतीमुळे देशभर विविध मंदिरांत पूजा-अर्चना सुरू होती, काही ठिकाणी यज्ञ सुरू झाले, मशिदी व चर्चमध्ये प्रार्थना झाल्या, दर्ग्यांवर चादर चढवून वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी विनवणी केली गेली.समाजमाध्यमांमध्येही माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीचेच संदेश फिरत होते आणि प्रत्येक जण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, अशाच प्रार्थना व्हॉट्सअॅपवरही करताना दिसत होता. काल रात्रीच त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आल्याने काही जण तर रात्रभर झोपूही शकले नाहीत.सात दिवसांचा दुखवटात्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे देशभर शोककळा पसरली असून, केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने व सर्व राज्यांनी या काळातील सारे सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्या निधनानंतर तिरंगा ध्वज अर्ध्यावर खाली आणण्यात आला. तसेच भाजपानेही आपल्या सर्व कार्यालयांवरील पक्षध्वज अर्ध्यावर आणून, १८ व १९ आॅगस्ट रोजी होणारे कार्यक्रम पुढे ढकलले. भाजपाची स्थापना वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालीच १९८0 मध्ये मुंबईत झाली होती आणि ते पक्षाचे पहिले अध्यक्ष होते.यमुनातीरी अटल स्मृतिस्थळयमुनातीरी सर्व प्रमुख नेत्यांच्या समाध्या असून, तिथेच अटलबिहारी वाजपेयी यांची समाधी आणि स्मृतिस्थळ उभारण्यासाठी यूपीएच्या काळातील कायदा बदलला जाणार आहे. यमुनातीरी यापुढे कोणत्याही नेत्याचे समाधीस्थळ होऊ नये, असा निर्णय आधी घेण्यात आला होता.त्यासाठी शहरी विकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. हे समाधीस्थळ राजघाटाच्या मागेअसू शकेल. ते अटल स्मृतिस्थळ, अटलघाट किंवा अटल किनारा नावाचे असेल.या प्रकरणी सरकारला विरोधक सहकार्य करतील, अशी भाजपाची अपेक्षा आहे. वाजपेयी यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची कारकीर्द पाहिली होती.कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधानभारतातील अटलबिहारी वाजपेयी हे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते, ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ते सरकार केवळ भाजपाचे नव्हते अन्य पक्षही त्यात सहभागी होते. म्हणजेच आघाडी सरकारचा हा पहिला प्रयोग वाजपेयी यांनीच यशस्वी करून दाखविला. त्याआधी आघाडी सरकारचा एकही प्रयोग यशस्वी झाला नव्हता. वाजपेयी यांच्या काळातच भारताने पाकिस्तानविरुद्धचे कारगिल युद्ध जिंकले आणि दुसरी अणुचाचणीही त्यांच्या काळातच झाली. उत्कृष्ट संसदपटू असलेल्या या नेत्याला ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी किताबाने गौरविण्यात आले होते.