नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतले अनेक रस्ते आज बंद राहणार आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड आणि पंजाबमध्ये शुक्रवारी सरकारी कार्यालयं आणि स्कूल-कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये आज सरकारी कार्यालयं, स्कूल आणि कॉलेज बंद राहणार आहेत. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 8 आठवड्यांहून अधिक काळ त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही टि्वटरवरून दुःख व्यक्त केलं आहे. दिल्ली सरकारमधील सर्व कार्यालयं, शाळा-कॉलेज आणि इतर संस्था अटलजींच्या निधनाच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार आहेत, अशीही माहिती सिसोदिया यांनी दिली. योगी सरकारनं वाजपेयींच्या निधनावर राज्यात सात दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. यादरम्यान सर्व सरकारी भवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली आणण्यात आला.योगी आदित्यनाथ म्हणाले, वाजपेयींचं प्रेरणास्थान असलेलं बटेश्वर, शिक्षण क्षेत्रासाठी नावाजलेलं असलेलं कानपूर, अटलजींच्या पहिल्या खासदारकीचं क्षेत्र बलरामपूर आणि कर्मभूमी लखनऊमध्ये त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी विशेष कार्य केलं जाणार आहे. त्यांच्या अस्थी प्रत्येक जिल्ह्यातील पवित्र नद्यांमध्ये विसर्जित केली जाणार आहे. वर्ष 1999 ते 2004पर्यंत माजी पंतप्रधान वाजपेयी हे लखनऊमधून खासदार राहिले होते. रेल्वे बोर्डानंही टेक्निशियनसाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द केली आली असून, केंद्र सरकारनं सर्व कार्यालयांत हाफ डे जाहीर केला आहे.
Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 7:51 AM