अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी लोकसभेत केलेले भाषण अत्यंत ओजस्वी होते. ‘मी मृत्यूला नव्हे, तर जननिंदेला घाबरतो,’ असे ते या भाषणात म्हणाले होते.या भाषणातील वाजपेयी यांच्या भाषणाचा काही अंश :आम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या काही नशिबामुळे जिंकलेल्या नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाल्या आहेत आणि आज अचानक आम्हाला केवळ आणखी काही जागा मिळाल्या नाहीत, म्हणून टोमणे मारले जात आहे. ठीक आहे, ही आमची थोडीशी कमजोरी राहून गेली, हे मी मान्य करतो.राष्ट्रपतींनी आम्हाला (सरकार स्थापन्याची) संधी दिली. आम्ही ती संधी स्वीकारली. आम्ही यशस्वी झालो नाही; पण तो मुद्दा वेगळा आहे; परंतु आम्ही सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून येथे बसलेले असू आणि हे सभागृह चालविण्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावीच लागेल. हे कधीही विसरू नका आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सभागृह चालविण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, तुम्हाला सत्ता हवी आहे, तर तुम्ही सत्ता घ्या. आम्ही या देशासाठी काम करू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही कधीच स्वस्थ बसणार नाही.तुम्ही हा देश चालवू इच्छिता. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा, अभिनंदन तुमच्यासोबत आहे. आम्ही देशाच्या सेवेत आम्हाला पूर्णपणे झोकून देऊ. आम्ही बहुमतासमोर नतमस्तक आहोत. आम्ही देशसेवेचे जे व्रत घेतले आहे, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही विश्रांती घेणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी माझा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींकडे जात आहे.
Atal Bihari Vajpayee : अविश्रांत देशसेवा करीत राहू, १३ दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी वाजपेयींनी केलेले भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:11 AM