मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीतून भाषण करत एक नवा इतिहास रचला होता. 1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते.
सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळाली.त्यांच्यापूर्वी भारतीय किंवा जगभरातील कोणत्याही नेत्याने संयुक्त राष्ट्रात हिंदीतून भाषण केले नव्हते. मात्र वाजपेयी यांनी हिंदीतून भाषण करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी हिंदीतून भाषण केले मात्र वाजपेयी यांनी या चांगल्या प्रथेची सुरुवात केली होती.
पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास
या भाषणामध्ये वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला शुभेच्छा देऊन सर्वांना संबोधित करायला सुरुवात केली होती. आमचे नवे सरकार सत्तेत येऊन केवळ सहाच महिने झाले आहेत मात्र आम्ही इतक्या कमीवेळात गतीमान पावले उचलून मूलभूत मानवाधिकार प्रस्थापित केले आहेत. देशातील भीती आणि दहशतीचे वातावरण आता संपले आहे असे त्यांनी सांगितले. घटनात्मक मार्गांचा वापर करुन लोकशाही आणि मूलभूत स्वातंत्र्याची पुनर्स्थापना करण्यात आल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
वसुधैव कुटुंबकम ही आमच्या देशातील लोकांची अत्यंत प्राचीन धारणा आहे. हे सर्व विश्व एक असून आपण त्याचे नागरीक आहोत यावर आमचा विश्वास आहे. सामान्य नागरिकाची प्रतिष्ठा आणि प्रगती याच्याशिवाय माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. संपूर्ण मानव समाजाला आपण न्याय देऊ शकतो का याकडे लक्ष देण्याची गरजही वाजपेयी यांनी व्यक्त केली होती. यावेळेस वाजपेयी यांनी आफ्रिकेतील अस्थैर्य आणि पश्चिम आशियातील नव्या संकटांची नांदी याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयीवेस्ट बँक आणि गाझामध्ये इस्रायल उभ्या करत असलेल्या नव्या वसाहतींमुळे प्रश्न निर्माण होतील व भविष्यात ते घातक ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. जीनिव्हा येथे परिषद बोलवून पीएलओला प्रतिनिधित्व देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. भाषणाचा शेवट 'जय हिंद' असा करण्याऐवजी 'जय जगत' असा करुन भारतीयांच्या सर्वसमावेशक भूमिकेचा पुन्हा एकदा सन्मान केला होता.