नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पत्रकार, कवी, लेखक, खासदार, पंतप्रधान अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या असल्या तरी ते एक उत्तम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. आपले म्हणणे स्पष्ट शब्दांमध्ये पण कोणालाही न दुखावता मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. आवेशपूर्ण शैलीमध्ये ते भाषण करत असले तरीही त्यांचे भाषण योग्य मुद्द्यांवरच होत असे.
1) तुम्हाला सत्तेचा लोभ झाल्यामुळे तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी घाई केलीत असा आरोप विरोधकांनी केल्यावर वाजपेयी यांनी अत्यंत भावनिक होत या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा 13 दिवसांचे सरकार शक्तीपरीक्षणासाठी लोकसभेत आले तेव्हा त्यांनी सरकार स्थापन करण्याची भूमिका, कोणत्या पक्षाला कसा जनादेश मिळाला आणि त्यांच्या पक्षाला जनादेश मिळण्याची कारणं स्पष्ट केली होती. आता माझ्याकडे संख्याबळ नाही त्यामुळे जनादेशाचा आदर करतो पण पुन्हा नव्याने लोकांकडून विश्वास प्राप्त करुन मी लोकसभेत येईन असे सांगत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास राष्ट्रपतींकडे जात आहे असे सांगितले. या भाषणामध्ये त्यांनी भारतीय लोकशाहीतील सहनशिलता कशी नष्ट होत चालली आहे हे सोदाहरण स्पष्ट करुन सांगितले. पूर्वीच्या काळी आम्ही लोकसभेत भाषणांमध्ये प्रखर टीका करत असू मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जराशीही टीका कोणाला सहन होत नाही असे सांगत त्यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले होते.
2) पोखरण येथे अणूचाचणी संपन्न झाल्यावर भारतावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले. तेव्हा भारतातही विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधकांच्या या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणूचाचणी घेतल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात असूनही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. आम्ही परराष्ट्रनितीच्या बाबतीत कोणाच्याही दबावाखाली न येता निर्णय घेतो अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना आणि भारताबाहेरील टीकाकारांना उत्तर दिले होते.
3) वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारच्या स्थापनेनंतर विश्वासदर्शक ठरावावर भाषण करताना त्यांनी आपण आपला पक्ष मोडून सत्ता मिळत असेल तर त्याला चिमटीनेही स्पर्श करणार नाही असे सांगितले होते. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपल्याच पक्षातून बाहेर पडून वेगळे सरकार स्थापन केले होते तसेच देशात इतरही भागांमध्ये असे प्रकार घडले होते. वाजपेयी यांनी मात्र अशी वेळ आपल्यावर आली तर त्या मार्गाने मी कधीच जाणार नाही असे स्पष्ट सांगून राजकीय नितिमत्तेचे दर्शन घडवले होते.
4) आणीबाणी संपल्यानंतर भारतामध्ये जनता सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. यावेळेस त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करण्याची संधी मिळाली. हे भाषण अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदीमधून केले. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीमधून भाषण पहिल्यांदाच होत होते. नव्या सरकारमुळे भारताची घडी पुन्हा बसवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरु आहेत यावर त्यांनी भाष्य केले होते.
5) पंतप्रधानपदी असताना लोकसभेत त्यांनी आम्ही विजयी झालो आहोत पण आम्ही विनम्र आहोत. पराजय झाल्यावर आत्ममंथन करण्याची गरज आहे अशा शब्दांमध्ये विरोधकांना फटकारले होते. जगभरातील मुस्लीम देश बदलत आहेत मात्र भारतामध्ये काळानुसार कायदे बदलण्याकडेही लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले होते. क्रिमिनल लॉ एक आहे तर सिविल लॉ का एक असू शकत नाही असा प्रश्नही विचारला होता. याबाबत वाजपेयी याचे विचार अत्यंत स्पष्ट व तर्कावर आधारित होते. मुस्लीम बंधूंनी आमच्या समाजाला तय़ार होण्यासाठी थोडा वेळ अधिक द्या आम्ही विचार करु असे कधीच म्हणताना दिसत नाहीत किंवा इतर पक्षही त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत नाहीत. त्याऐवजी टीका करण्यातच विरोधक धन्यता मानतात असे त्यांनी या भाषणामध्ये सांगितले होते.