नवी दिल्ली : अटल बिहारी वायपेयींनी देशवासियांच्या आकांक्षांना पूर्ण केले. त्यांनी भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले. विदेश नितीसाठी जे आवश्यक होते ते सर्व केले. अणुबॉम्बची चाचणी ते काश्मीरपर्यंत वाजपेयींनी दिलेल्या दृष्टीमुळे भारताची जगभरात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्यामुळे काश्मीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि जगभरात दहशतवादाची चर्चा होऊ लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, आरएसएसचे मोहन भागवत, योगगुरु रामदेव बाबा यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले, की वाजपेयी यांनी लहानपणापासून ते त्यांचे शरीर जोपर्यंत साथ देते होते तोपर्यंत देशाची सेवा केली. देशाचा तेव्हाचा राजकीय कालखंड बदनामीने भरलेला असतानाही त्यांनी वेगळी विचारधारा ठेवून प्रवास केला. शून्यातून विश्व कसे निर्माण केले जाते, हे वाजपेयींच्या कामातून दिसते.
अटलबिहारी वाजपेयींसोबत एवढ्या सभा केल्या, परंतू त्यांना श्रद्धांजली देण्याच्या सभेमध्ये आपण बोलण्याचा कधीही विचार केला नव्हता. मी एक पुस्तक लिहिले होते. मात्र, या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वाजपेयी नसल्याचे मला दु:ख झाल्याचे, एकेकाळी वाजपेयींसोबत काम केलेले भाजपचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी सांगत वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.वाजपेयींना जेवण बनविण्याचा छंद होता. ते खूप स्वादिष्ट जेवण बनवायाचे. वाजपेयींकडून आपण खूप काही शिकलो. त्यांच्या अनुपस्थितीत बोलायला लागतेय याचे दु:ख होते, असे शेवटी अडवाणी म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक आयुष्यात एवढे मोठे यश संपादन केल्यानंतरही वाजपेयी सर्वसामान्यांच्या बाबतीत संवेदनशील होते. त्यांच्यातील कवी त्यांनी शेवटपर्यंत जिवंत ठेवला होता, असेही भागवत यांनी सांगितले.