नवी दिल्ली: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना सनी, लवलेश आणि अरुण यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या. खाली पडल्यानंतरही हे तिघे अगदी जवळून दोघांवर गोळ्या झाडत राहिले. यावेळी पोलिसांनी तिघांना तत्काळ पकडले.
गोळीबाराची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आले. २००५ मधील उमेश पाल खून खटल्याच्या सुनावणीसाठी या दोघांना येथे आणण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या पोलिस चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि एक साथीदार मारला गेला होता.
तिघे हल्लेखोर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींप्रमाणे आयकार्ड गळ्यात अडकवून आले होते. हल्ल्यानंतर तिघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तिघेही पोलिसांना स्वाधीन झाले. गोळीबार करताना ते तिघेही जय श्रीराम अशा घोषणा देत होते. या ठिकाणी न्यूज चॅनेल्सचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.
अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीने बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी एका हल्लेखोराच्या नातेवाईकांला अतिकने मारले होते, त्यामुळे आता मी हल्ला केल्याची माहिती एका हल्लेखोराने पोलिसांना दिली आहे. पोलीस याबाबत आता अधिक तपास करत आहे.
१७ पोलीस कर्मचारी निलंबित-
अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.