Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही दोन्ही भावांना गोळ्या घालण्यात आल्या. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, अतिकने स्वतःवरच हल्ला करण्याचा कट रचला होता. यासाठी गुड्डू मुस्लिम या आपल्या खास माणसावर जबाबदारी दिली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक अहमदने आपला खास माणूस, शार्प शूटर तसेच बॉम्ब तयार करण्यात एक्सपर्ट मानल्या जाणाऱ्या गुड्डू मुस्लिमवर या सर्व प्लानची जबाबदारी सोपवली होती. अतिकला स्वतःवरच हल्ला करून पोलीस संरक्षण वाढवून घ्यायचे होते. हा प्लान साबरमती तुरुंगात असल्यापासून केला जात होता. गुड्डूने यासाठी काही गुन्हेगारांशी संपर्कही साधला होता. या नाटकानंतर आपल्याला कुणी मारू शकणार नाही. पोलीसही एन्काऊंटर करू शकणार नाही आणि अन्य टोळीचे गुंडही मारू शकणार नाही, अशी अतिकची धारणा होती, असे पोलिसांनी सांगितले.
अतिक अहमदला कोणतेही नुकसान न होता हल्ला घडवायचा कट
अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ याला कोणतीही इजा अगर नुकसान न होता, दिखाव्यासाठी हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. या कटात अतिकसमोर गोळीबार करणे आणि बॉम्बस्फोट घडवणे असे स्वरुप या हल्ल्याचे नियोजित करण्यात आले होते. असे केल्याने अतिकची सुरक्षा वाढवून मागता आली असती आणि त्याच्या जीवाला धोका नसता, असा प्लान रचला जात होता, असेही पोलिसांनी सांगितले. या प्लानची अंमलबजावणी करण्यासाठी काही गुन्हेगार प्रयागराजमध्ये दाखल झाले होते, अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अतिकने हत्येपूर्वी कुणाला केला होता इशारा?
अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते. तेव्हा अतिकने पोलिसांच्या वाहनातून उतरताना कुणाला तरी इशारा केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत पोलिसांच्या जीपमधून खाली उतरत असताना अतिक काही क्षण थांबला. सुमारे काही सेकंद त्याने रुग्णालयाच्या आसपास नजर फिरवली. त्यानंतर अतिकने मान हलवून काहीतरी इशारा केला आणि मगच पोलीस जीपमधून खाली उतरला. यानंतर रुग्णालय परिसरात येताच अतिक आणि अशरफ यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आणि या हल्ल्यात जागीच दोघांचा मृत्यू झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"