उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या दोघांनाही मेडिकलसाठी नेत असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात योगी सरकारमधील मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. स्वतंत्रदेव सिंह यांनी नाव न घेता, याच जन्मात पाप-पुण्याचा हिशेब होतो, असे म्हटले आहे.
या दोघांनाही 2005 मधील उमेश पाल हत्याकांड प्रकरणी, प्रयागराज येथे एका न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यापूर्वी, 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.
4 जणांचं एनकाउंटर, 3 जणांचा शोध सुरू -उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.