Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. यातच आता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. खासदार राहिलेल्या अतिक अहमद यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तेही वाराणसीतून निवडणूक लढवली होती, अशी माहिती समोर येत आहे.
शनिवारी रात्री अतिक अहमदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडापासून अतिक अहमद देशभर चर्चेत आहे. अतिक अहमद पाचवेळा आमदार आणि एकदा खासदार होता. १९८९ ते २००२ पर्यंत अलाहाबाद पश्चिम मतदार संघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आला होता. २००२ मध्ये तो समाजवादी पार्टीच्या तिकीटावर या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आला. त्यानंतर त्याने सपाला सोडचिठ्ठी देत करत स्वतःचा ‘अपना दल’ नावाचा पक्ष स्थापन केला. सन २००४ मध्ये तो पुन्हा एकदा याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला. तर, सन २००९ साली अतिक अहमद समाजवादी पार्टीच्या तिकीटावर फुलपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आला होता.
अतिकने थेट पंतप्रधान मोदींविरोधात लढवली होती लोकसभा निवडणूक
अतिकने नॅनी सेंट्रल जेलमध्ये असताना पंतप्रधान मोदींविरोधात निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. सन २०१९ मध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वाराणसीतून लोकसभेसाठी उभा राहिला. निवडणूक लढण्यासाठी अतिकने त्यावेळी न्यायलयाकडे पॅरोलची मागणी केली होती. परंतु ती मागणी न्यायालयाने फेटाळली होती. अतिक प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर पडू शकला नाही. या निवडणुकीत अतिकला ८५५ मते मिळाली होती. तर नरेंद्र मोदी यांना तब्बल ६,७४,६६४ मते मिळाली होती.
दरम्यान, मनमोहन सिंग अमेरिकेशी अणुकरार करायचे ठरवले होते. मात्र, सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी विरोध करत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे २२ जुलै २००८ रोजी लोकसभेत मनमोहन सिंग सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावेळी अतिक अहमद हा एका खुनाच्या गुन्ह्यात मैनपुरी तुरुंगात शिक्षा भोगत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, अतिक अहमदला संसदेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात दिल्लीत आणण्यात आले होते. जेणेकरून ते विश्वासदर्शक ठरावात मतदान करू शकतील. लोकसभेत मतदान झाले तेव्हा मुलायम सिंह यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून अतिक अहमदने सरकारच्या विरोधात मतदान केले होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारने ५४३ सदस्यांच्या लोकसभेत २७५ मते मिळवली, तर सरकारच्या विरोधात २५६ मते पडली. सपाच्या ३९ खासदारांपैकी सहा खासदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"