आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी आरोप केला आहे की, भीषण उष्णता आणि दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा हरियाणाचं सरकार राष्ट्रीय राजधानीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. 25 मे पर्यंत भाजपा नवनवीन कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत राहील, असं आतिशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दिल्लीला होणारा पाणीपुरवठा कमी किंवा बंद करू नये, यासाठी आम्ही हरियाणा सरकारला पत्र लिहिणार आहोत. गरज पडल्यास दिल्लीच्या हिस्स्याचं पाणी मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊ. हरियाणा सरकार यमुनेचे पाणी बंद करत आहे. हरियाणा सरकार दिल्लीचा पाणीपुरवठा वारंवार बंद करत आहे. 11 मेपासून दिल्लीचा पाणीपुरवठा बंद करण्याचे कारस्थान सुरू आहे असं म्हटलं आहे.
दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत सुरू असलेल्या राजकीय युद्धादरम्यान दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी बुधवारी मोठं विधान केलं आहे. दिल्लीतील सातही जागांवर मतदान होण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष नवं षड्यंत्र रचण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 25 मे रोजी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर मतदान होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचं हे नवं षडयंत्र असल्याचा आरोप अतिशी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामिनातून बाहेर आल्यानंतर भाजपा आणखी अडचणीत आली आहे. दिल्लीतील जनतेने सातही जागांवर भाजपाचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. हा संकेत समजताच ती घाबरली. त्यामुळेच भाजपा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कट रचण्यात व्यस्त आहे. देशातील तरुण बेरोजगार आहेत. महागाई शिगेला पोहोचली आहे. भाजपा या मुद्द्यावर काहीही बोलण्याचे टाळत आहे असंही सांगितलं.
आतिशी यांनी 21 मे रोजी सांगितले होतं की, 4 जून नंतर देशात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल. त्यानंतर भाजपाचे अनेक नेते आणि ईडीचे अधिकारी इलेक्टोरल बाँड घोटाळा प्रकरणात तुरुंगात जाणार आहेत. अलीकडेच आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, पण त्याच्याशी असहमतही आहोत.