नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तर सत्ताधारी आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपच्या पराभवानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी सातवी विधानसभाही बरखास्त केली आहे.
८ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. २७ वर्षांनंतर आता भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला ७० पैकी २२ जागा मिळाल्या, तर भाजपला ४८ जागा मिळाल्या. विजयानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
२०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपने शानदार विजय मिळवला होता. मात्र, यावेळी आपला निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जागा ७० पैकी २२ पर्यंत कमी झाल्या आहेत. तसेच, या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसला असून खातेही उघडता आले नाही.
आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्याआतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनीही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. आतिशी यांचा कार्यकाळ फक्त साडेचार महिन्यांचा राहिला
निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभवया विधानसभा निवडणुकीत आपचे तीन मंत्री विजयी झाले आहेत. गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांनी आपापल्या जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सतेंद्र जैन यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.