Who is Atishi : अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचामुख्यमंत्री कोण? हे गूढ अखेर संपले. केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. चार वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवून आमदार बनलेल्या आतिशी यांच्याकडे आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्रिपद आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या आतिशी यांच्या राजकीय कारकीर्दीची आता चर्चा होत आहे.
८ जून १९८१ मध्ये जन्मलेल्या आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात. त्यांच्या आईचे नाव तृप्ता सिंह आणि वडिलांचे विजय सिंह असे आहे. पण, आतिशी त्यांचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना असे लिहितात. मार्क्स आणि लेनिनच्या विचाराने प्रभावित झालेल्या आतिशी यांनी स्वतःच्या नावासमोर मार्लेना असे नाव जोडले.
२०२० मध्ये पहिल्यांदा बनल्या आमदार
आतिशी यांनी २०१९ लोकसभेची निवडणूक लढवली होती. भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून त्यांना ४ लाख ७७ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्या तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये आतिशी यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्या दिल्ली विधानसभेत पोहोचल्या. आतिशी यांनी भाजपाचे उमेदवार धर्मवीर सिंह यांना ११ हजार ३९३ मतांनी पराभूत केले होते.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा सुरू झाल्यानंतर आतिशी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. ९ मार्च २०२३ मध्ये त्या कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आली. दिल्ली सरकारमध्ये आतिशी यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. शिक्षण, पीडब्ल्यूडी, जल संपदा, महसूल, योजना आणि वित्त या महत्त्वाच्या खात्यांचे काम त्या पाहताहेत
आमदार होण्यापूर्वी होत्या सल्लागार
आतिशी आपशी जोडल्या गेल्यानंतर २०१५ ते २०१८ पर्यंत मनिष सिसोदिया यांच्या शिक्षण विभागासंदर्भात सल्लागार होत्या. २०१५ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात झालेल्या जल सत्याग्रहातही त्या सहभागी झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यामधून काम करत असताना त्यांनी आपमधून राजकीय कारकीर्द सुरू केली होती.
आतिशी यांचे शिक्षण
दिल्लीत जन्मलेल्या आतिशी यांचे वडील विजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीती स्प्रिंगडेल स्कूलमध्ये झाले. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी घेतली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून शेवनिंग स्कॉलरशिप घेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
आतिशी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील एका गावात सात वर्ष घालवली. तिथे त्यांनी जैविक शेती आणि प्रगतीशिल शेतीशी जोडल्या गेल्या. स्वयंसेवी संघटनासोबत त्यांनी काम केले. तिथे त्यांची भेट आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झाली आणि त्यानंतर त्या आपकडे वळल्या.
आतिशी याची राजकीय आपची धोरणे, निवडणूक अजेंडा आणि इतर गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. पक्षाची भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केले आहे.