नवी दिल्ली : इंडियन बँकेपाठोपाठ आता सर्वच बँकांच्या एटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी १०० रुपये ते ५०० रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे ग्राहकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.आपल्या सुमारे ४० हजार एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय इंडियन बँकेने आधीच घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून होणार आहे. एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्यावर त्याचे सुटे करण्यासाठी ग्राहकांना खूप वणवण करावी लागते. अनेकदा ते बँकेत सुटे घेण्यासाठी येतात. त्यात फार वेळही जातो. त्यामुळे आम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा आमच्या एटीएममध्ये ठेवणार नाही, असे इंडियन बँकेने जाहीर केले होते.आता देशभरातील सुमारे २ लाख ४0 हजार एटीएममध्येही दोन हजार रुपयांच्या नोटा नसतील. तिथेही १०० रुपये, २०० रुपये व ५०० रुपये या मूल्याच्या नोटाच उपलब्ध होतील. प्रत्येक एटीएममध्ये चार ट्रे असतात. त्यापैकी एका ट्रेमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवण्यात येत असत. पण यापुढे तो रिकामाच राहील. हे सारे होण्यासाठी किमान १ महिना जाईल, असा अंदाज आहे.छपाई सुरू की बंद?पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना रोख रकमेची टंचाई भासू नये, म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. पण, मोठ्या रकमेचे सुटे वा मोड मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी तेव्हापासून सुरूच होत्या.
कोणत्याच एटीएममध्ये यापुढे नसतील दोन हजारांच्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 1:51 AM