पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पॅकेजसंदर्भात गेले काही दिवस सतत पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. सलग पाचव्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी आज शेवटची पत्रकार परिषद घेतली.
निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा काढण्यात आला असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहिर केले आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले आहे.
निर्मला सीतारामन यांनी जनधन खातं असलेल्या महिलांना १० हजार २२५ कोटी रुपये मिळाले असल्याचे सांगितले. तसेच २.२ कोटी इमारत आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात ३,९५० कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मजुरांना स्थानकांवर आणण्याची विनंती राज्यांना करण्यात आली. केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च उचलला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लोकांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, गेल्या काही वर्षांतील उपक्रमामुळे आम्हाला हे करणं शक्य झाले आहे. कोरोना संकटकाळात १५ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले आहे.
निर्मला सीतारमण यांनी याआधी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. तसेच संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.